रमाई घरकुल योजनेचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:40 AM2021-08-14T04:40:27+5:302021-08-14T04:40:27+5:30
मेहकर तालुक्यातील भोसा ग्रामपंचायतच्या सरपंच गुंफाबाई शिंदे यांचा मुलगा किशोर शिंदे यांनी सरपंचाच्या काळात सन २०१७-१८ मध्ये ...
मेहकर तालुक्यातील भोसा ग्रामपंचायतच्या सरपंच गुंफाबाई शिंदे यांचा मुलगा किशोर शिंदे यांनी सरपंचाच्या काळात सन २०१७-१८ मध्ये रमाई घरकुल योजनेचा लाभ घेतला. त्यांच्या पुतण्याने रमाई घरकुल योजनेचा लाभ घेतला. ग्रामपंचायतने आरओ प्लँटमध्येही गैरव्यवहार केला आहे. त्यामुळे भोसा ग्रामपंचायतीने आर्थिक व्यवहारात गैरप्रकार केल्याचे आरोप ग्रामपंचायत सदस्य सीमा शिवशंकर घाटे यांचे पती शिवशंकर श्रीकिसन घाटे यांनी निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केला आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करून शासकीय घरकुलाचा लाभ घेणाऱ्या सरपंचांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अन्यथा १५ ऑगस्टला आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावरून मेहकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आशिष पवार यांनी पंचायत विस्तार अधिकारी सोनुने व खंडागळे यांची चौकशी समिती नेमून चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशी समितीने भोसा ग्रामपंचायतीमध्ये जाऊन चौकशी केली. यावेळी भोसा ग्रामपंचायतचे उपसरपंच राजू नारायण भोंंडणे, ग्रामसेवक पी. के. गवई यांनी चौकशी समितीला अहवाल दिला आहे.
रेशनकार्डमध्ये खाडाखोड
विस्तार अधिकारी सोनुने यांना घरकुल योजनेबाबत विचारणा केली असता त्यांनी सरपंचाच्या मुलाने रमाई घरकुलाचा लाभ घेतला असल्याचे सांगितले. रेशनकार्डच्या तारखेमध्ये खाडाखोड असल्याचे चौकशी समितीला आढळून आल्याची माहिती विस्तार अधिकारी सोनुने यांनी दिली.
भोसा ग्रामपंचायतीच्या सरपंच व सचिवांवर कलम १३९ प्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे.
आशिष पवार, गटविकास अधिकारी, पंचायत समिती मेहकर.