बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला काँग्रेसचा आसूड मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 04:00 PM2018-06-30T16:00:10+5:302018-06-30T16:03:46+5:30
बुलडाणा : शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावे, संपूर्ण कर्जमाफी व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ३० जून रोजी दुपारी तीन वाजता आसूड मोर्चा काढला.
बुलडाणा : शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावे, संपूर्ण कर्जमाफी व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ३० जून रोजी दुपारी तीन वाजता आसूड मोर्चा काढला. अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव मुकूल वासनिक यांच्या नेतृत्त्वात हा मोर्चा काढण्यात आला असून जिल्ह्यातील शेकडो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले आहेत. दरम्यान, राज्य शासनाची कर्जमाफी ही ऐतिहासिक फसवी योजना असून शेतकरी सन्मानाऐवजी शेतकऱ्यांचा अपमान करणारी ही योजना असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार तथा जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष राहूल बोंद्रे यांनी केला आहे. बुलडाण्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी ‘इटा पिडा टळो आणि मोदी देशातून पळो’ अशी घोषणाच केली. हे सरकार फक्त समस्या घेऊन आले आहे. शेतकरी, व्यापारी, युवा वर्ग, मजूर सर्वच या समस्येमध्ये अडकले आहेत. बँक कर्ज देत नाही, व्यापारी उधार देत नाही, पाऊस पडत नाही आणि पीक कर्ज ही मिळत नाही, अशा या समस्या या सरकारच्या काळात निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे सत्तेतून त्यांना खाली खेचण्यासाठी सर्वांनी आता रस्त्यावर उतरण्याचे आवाहन सपकाळ यांनी केले. शहरातील जिजामाता प्रेक्षागाराच्या मैदानावर काँग्रेसचे राष्ट्रीय नेते मुकूल वासनिक यांच्या उपस्थितीत शेतकर्यांना मार्गदर्शन करताना उपरोक्त द्वय बोलत होते. यावेळी आ. विरेंद्र जगताप, माजी खासदार उल्हास पाटील, अजहर हुसैन, श्याम उमाळकर, माजी अध्यक्ष विजय अंभोरे यांच्यासह बुलडाणा जिल्ह्यातील काँग्रेसमधील दिग्गज मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुसरीकडे यावेळी बोलताना माजी आ. दिलीपकुमार सानंदा भाजप सरकार देशात धार्मिक तणाव निर्माण करत असून मराठा आरक्षण, धनगर समाज आरक्षणाचे नुसतेच आश्वानस या सरकारने दिले आहे. प्रत्यक्षात दिलेल्या एकाही आश्वासनाची त्यांनी पुर्तता केली नसल्याचे ते म्हणाले. सोबतच ‘फेकू भगाव देश बचाव’ असा नाराच जिजामाता प्रेक्षागारात मोर्चास प्रारंभ होण्यापूर्वी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी दिला. सध्या जिजामाता प्रेक्षागारातून हा मोर्चा निघाला असून संगम चौक, जयस्तंभ चौक, आठवडी बाजार मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. तेथे अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव मुकूल वासनिक हे उपस्थितांना संबोधित करणार आहे. दरम्यान, या मोर्चामध्ये बैलगाड्यांसह शेतकरी वर्ग सहभागी झाला असून ‘नुसत्याच घोषणा, घोषणांचे गाजर, कर्जमाफी द्या... कुठे आडवे गेले मांजर’ असे घोषणा फलक घेऊन काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी वर्ग मोर्चामध्ये सहभागी झाला आहे.