बुलडाणा : नोंदणीकृत बांधकाम कामगारांना कल्याणकारी मंडळाकडून २९ कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येतो. यात अवजारे खरेदीसाठी ५ हजार रुपये अर्थसहाय्य अत्यावश्यक सुविधा दिल्या जातात. जिल्ह्यातील कामगारांना या अनुदानाची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. दरम्यान, नोंदणीकृत बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ ३१ आॅगस्ट रोजी दिला जाणार आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जळगांव जामोद येथे ३१ आॅगस्ट रोजी कामगारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांचे हस्ते नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मंडळातील कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जाणार आहे. बांधकाम कामगारांना प्रथम नोंदणीकृत होऊन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येतो. यात अवजारे खरेदीसाठी पाच हजार रुपये, अर्थसहाय्य अत्यावश्यक वस्तूसंच व सुरक्षा संच मोफत दिला जाते. विवाहासाठी अर्थसहाय्य, दोन अपत्यांच्या प्रसुतीसाठी अर्थसहाय्य त्याचप्रमाणे वर्ग दुसरी पासून शिक्षण होईपर्यंत दोन अपत्यांना वार्षिक शिष्यवृत्ती अर्थसहाय्य, दुर्धर रोग उपचार अर्थसहाय्य, नैसर्गिक मृत्यू झाल्यास अर्थसहाय्य, अपघाती मृत्यू झाल्यास वारसास आर्थिक सहाय्य, कौशल्य वृद्धीकरण प्रशिक्षण, आरोग्य तपासणी, मध्यान्ह भोजन व विमा योजनेच्या अंतर्गत अर्थसहाय्य यांचा समावेश आहे. असंघटीत बांधकाम कामगारांना मंडळात नोंदणीकृत होण्यासाठी आधारकार्ड, रेशनकार्ड, बँक पासबुक, जन्मतारखेचा तपशिल दस्ताऐवज, ९० दिवसांचे काम केल्याचे प्रमाणपत्र (प्राधिकृत अधिकाºयांचे) तीन पासपोर्ट फोटोसह नोंदणी शुल्क ८५ रुपये भरुन मंडळाकडून पावती (पाच वर्षाकरिता) तसेच ओळखपत्र प्राप्त करुन घेता येते. यासाठी नोंदणी कार्यालय किंवा सरकारी कामगार अधिकारी, बुलडाणा येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त राजू दे. गुल्हाने यांनी केले आहे.