नदीवरील पुलाचे काम प्रगतिपथावर
डोमरूळ : कुंबेफळ जवळील बाणगंगा नदीवरील पुलाचे काम प्रगतिपथावर आहे. पावसाळ्यात पुलामुळे अनेक दशकापासून दरवर्षी विदर्भासह मराठवाड्यातील जनतेला नाहक त्रासाला तोंड द्यावे लागत होते. यावेळी तसा त्रास राहणार नाही.
आजारांमध्ये वाढ !
बुलडाणा : जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण व सकाळच्या वेळेस थंड हवा सुटत आहे. कोरोनाचे रूग्ण वाढत असतानाच हवामान बदलामुळे थंडी, ताप, घसा, खोकला, अंगदुखी आदी व्हायरल आजार वाढले आहेत.
बियाणे अनुदान वाढविण्याची मागणी
बुलडाणा : शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे देऊनही भाववाढीमुळे बियाणे खरेदी परवडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. शेतकरी सध्या अडचणीत असल्याने अनुदान वाढविण्याची मागणी होत आहे.
पल्स ऑक्सिमीटर नावालाच
बुलडाणा : आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे ७११ पल्स ऑक्सिमीटर उपलब्ध करण्यात आले आहे. संदिग्धांचे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण या यंत्राच्या माध्यमातून मोजण्यात येते. परंतु त्याचा वापर होत नसल्याने ऑक्सिमीटर नावालाच राहते.
जलमित्रांची दुग्ध व्यवसायात भरारी
धामणगाव बढे : पाणी फाउंडेशन अंतर्गत समृद्ध गाव स्पर्धेच्या अनुषंगाने मोताळा तालुक्यातील सिंदखेड येथील जलमित्रांची वाटचाल दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून लखपती किसान या संकल्पनेकडे सुरू झाली आहे.
खाद्यतेलाचे भाव वाढल्याने फाेडणी महागली
धामणगाव धाड : एकीकडे नागरिक कोरोनाच्या संकटामुळे हतबल झाले, तर दुसरीकडे कडक निर्बंध आणि दरराेजच्या उपयोगात येणारे खाद्यतेल, गॅस सिलिंडर, पेट्रोल, अशा अनेक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यात सर्वसामान्य व्यक्ती मात्र नाहक होरपळून जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य गृहिणी सुद्धा चिंता व्यक्त करताना दिसत आहेत.
धामणगाव बढे परिसरात खरीप हंगामाची तयारी
धामणगाव बढे : परिसरात सध्या खरीप हंगामाची पूर्व तयारी सुरू आहे. कापूस, सोयाबीन, मका हे या भागातील प्रमुख पीक असून, पेरणीपूर्वी जमिनीची मशागत करण्यात शेतकरी व्यस्त आहे. ठिबक नळ्या पसरविणे, जमीन नांगरणी करणे, चांगल्या बियाण्यांची माहिती करून घेणे, आदी कामे होताना दिसत आहे.
कुटुंबातील तरुणांचे लसीकरण कधी?
बुलडाणा : ज्येष्ठांचे कोरोना लसीकरण समाधानकारक झाले असतानाच आता तरुणांचे लसीकरण कधी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या घरात ज्येष्ठ आहेत व स्वत:चे लसीकरण झाले आहे, अशांना घरातील तरुणांच्या लसीकरणाची चिंता सतावते आहे. सध्या १८ ते १४ वयोगटातील लाभार्थींना लसीची प्रतीक्षा लागलेली आहे.
पाणंद रस्त्याच्या दुरुस्तीची गरज
किनगावराजा : हिवरखेड ते बारलिंगा हा गावाकडील पाणंद रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे. बारलिंगा, खैरव, टाकरखेड येथून येणारे बरेच नागरिक या रस्त्याने येणे जाणे करतात.
सवडद येथे विलगीकरण कक्ष केला स्थापन
साखरखेर्डा : ग्रामीण भागामध्ये वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता आपले गाव कसे सुरक्षित राहील, तसेच रुग्णसंख्या कशी आटोक्यात आणता येईल यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने पुढाकार घेण्याची गरज आहे . त्या अनुषंगाने सवडद येथील ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन गावातच विलगीकरण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.