साथरोग नियंत्रणावर कंटेनर सर्व्हेची मात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:24 AM2021-06-18T04:24:49+5:302021-06-18T04:24:49+5:30
विशेष डासामार्फत प्रसारित होणारे हत्तीरोग, डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया या रोगांच्या नियंत्रणासाठी नियमित कार्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. ...
विशेष डासामार्फत प्रसारित होणारे हत्तीरोग, डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया या रोगांच्या नियंत्रणासाठी नियमित कार्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे, जिल्हा हिवताप अधिकारी शिवराज चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात हिवताप प्रतिरोध कार्यक्रम घेण्यात येत आहे. साथरोग नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. जेणेकरून या रोगांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवणे शक्य होईल. डेंग्यूसारख्या रोगावर निश्चित औषधोपचार नसल्यामुळे तसेच हा रोग जीवघेणा असल्यामुळे त्यावर प्रतिबंधात्मक योजना राबविणे हा एकच योग्य मार्ग आहे. सध्या पावसाळा असल्यामुळे डासांची पैदास होऊन आजार पसरण्याची भीती वाटत आहे. डासांमार्फत होणारे आजार दूर करण्याकरिता आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. आशा बळकटीकरणात आशांना रक्तनमुना घेणे, कंटेनर सर्व्हेक्षण करणे, डास उत्पत्तिस्थाने शोधणे, गप्पी मासे सोडणे, संडासच्या गॅसपाईपला जाळ्या बसविणे याविषयी माहिती देण्यात येत आहे. या मोहिमेत आरोग्य सहायक पाखरे, आरोग्यसेवक बाहेकर, जुमडे, वनारे, जाधव, पडोळकर, इंगळे, आदींनी सहभाग घेतला आहे.
अशा कराव्यात उपाययोजना
नागरिकांनी एक दिवस कोरडा दिवस पाळावा, झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा, अंगभर कपडे घालावेत, दाराला व खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात, ताप आल्यास रुग्णालयाशी संपर्क साधावा, भंगार साहित्य, टायर्स, कुलर्स, नारळाच्या करवंट्या, प्लास्टिकची तुटलेली भांडी, गाडगे, मडके, आदी सर्व वस्तू नष्ट कराव्यात.
पाच महिन्यांतील सॅम्पल
१२
डेंग्यू
१३१७०५
मलेरिया