खामगावातील झोपडपट्टी परिसरातून कोरोना हद्दपार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 06:01 PM2020-12-27T18:01:50+5:302020-12-27T18:02:04+5:30
Khamgaon News रूग्णांच्या संख्येत झपाट्याने घट होत असल्याने खामगाव शहरातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : कधी काळी कोरोनासाठी हाॅटस्पाॅट केंद्र ठरलेल्या खामगाव शहरातील अनेक मागासवस्त्यांतून कोरोना हद्दपार झाल्याचे समाधानकारक चित्र दिसून येत आहे. गतकाही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने घट होत असल्याने खामगाव शहरातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. खामगाव शहरातील विविध मागास वस्त्यांमध्ये एकुण ४६५ कोरोनाचे संक्रमित रूग्ण आढळून आले होते. यामध्ये बहुतांश रूग्ण बरे झाले असून ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना विषाणू संक्रमनाने देशात धुमाकूळ घातला असतानाच, सुरूवातीला बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाची रूग्णसंख्या बोटावर मोजण्या इतकी होती. जिल्हा कोरोना मुक्त झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पासूनच मोठ्याप्रमाणात कोरोनाचे रूग्ण आढळून आले. यामध्ये मलकापूर आणि खामगाव ही दोन तालुके कोरोनासाठी हाॅटस्पाॅट ठरले होते. खामगाव शहरातील कोरोना ग्रस्तांची रूग्णसंख्या१२६४ आहे. यामध्ये झोपडपट्टी भागातील रूग्णांची संख्या ४६५ इतकी आहे. खामगाव तालुक्यातील ग्रामीण भागात ६७० रूग्ण आढळून आले होते. खामगाव तालुक्यातील पहीला रूग्ण चितोडा येथे आढळून आला होता. त्यानंतर जळका भंडग येथे एकाच कुटुंबातील आठ जण कोरोना पाॅझीटीव्ह आढळून आले होते. कधीकाळी कोरोनाचे हाॅटस्पाॅट केंद्र ठरलेल्या खामगाव शहरातील रूग्ण संख्येत आता झपाट्याने घट होत आहे. खामगावातील मागासवस्तीमधून कोरोना आता कोरोना जवळपास हद्दपार झाला आहे. त्यामुळे कोरोनाबद्दलची भीतीही संपुष्टात येत असल्याचे चित्र खामगाव आणि परिसरात दिसून येत आहे. त्यामुळे खामगाव तालुक्यात कोरोना चाचण्याही थंडावल्या आहेत.
कोरोना विषाणू संसर्गाचा शहराला फटका बसला होता. मागासवस्त्यांमध्ये कोरोनाचा धुमाकुळ होता. दरम्यान, आता कोरोनाच्या रूग्णसंख्येत समाधानकारक घट होत आहे. मागास वस्तीमध्येही कोरोना रूग्णांचे प्रमाण अत्यल्प आहेे
- डॉ. निलेश टापरे
निवासी वैद्यकीय अधिकारी , खामगाव.