जिल्ह्यातील कोरोना संक्रमण नियंत्रणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:34 AM2021-07-29T04:34:16+5:302021-07-29T04:34:16+5:30
एक प्रकारे कोरोना मुक्तीच्या दिशेने जिल्ह्याची ही वाटचाल असल्याचे संकेत मिळत आहे. दरम्यान कोरोना बाधितांची संख्या जुलै महिन्याच्या अखेरीस ...
एक प्रकारे कोरोना मुक्तीच्या दिशेने जिल्ह्याची ही वाटचाल असल्याचे संकेत मिळत आहे. दरम्यान कोरोना बाधितांची संख्या जुलै महिन्याच्या अखेरीस निच्चांकी पातळीवर आल्याने आरोग्य यंत्रणेसाठीही ही बाब हुरूप वाढविणारी आहे. दरम्यान, पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये चिखली शहरातील डीपी रोडवरील एका व्यक्तीचा समावेश आहे. दरम्यान, आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ६ लाख ३३ हजार ७६२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोबतच ८६ हजार ५५२ कोरोनाबाधितांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली आहे. अद्यापही १ हजार ५०४ संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ८७ हजार २४७ झाली आहे. यापैकी २३ सक्रिय रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात ६७२ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे जिल्ह्याचा सरासरी पॉझिटिव्हिटी रेट हा १२ टक्क्यांच्या आसपास स्थिरावला आहे. येत्या काळात त्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे.
--७ टक्के नागरिकांचे लसीकरण--
कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या (१,७८,६६२) आता ६.९७ टक्क्यांवर अर्थात ७ टक्क्यांवर पोहोचली आहे. कोरोनाचे संक्रमण एकीकडे जिल्ह्यात घटत असतानाच आता लसीकरणाचाही वेग वाढविण्याची गरज आहे. नाही म्हणायला जिल्ह्यातील ६ लाख ९२ हजार ४१७ नागरिकांनी अर्थात २७ टक्के नागरिकांनी लसीचा एक डोस घेतला आहे. त्यामुळे आता लसीकरणाचा वेग वाढविणे गरजेचे झाले आहे. ते झाल्यास कोरोनाला जिल्ह्यात प्रतिबंध घालून कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणे शक्य होईल.
--संदिग्ध डेल्टा प्लस नमुन्यात घट--
गेल्या दोन महिन्यांपासून संदिग्ध वाटणाऱ्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे सरासरी १०० नमुने बुलडाणा जिल्ह्यातून एनआयव्ही व दिल्ली येथील संस्थेकडे पाठविण्यात येत होते. मात्र कोरोनाचे संक्रमण घटल्यामुळे अशा संदिग्ध नमुन्यांचेही प्रमाण कमी झाले असून येत्या दोन दिवसात जवळपास ३५ नमुने अनुषंगिक तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.