लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी गेल्या दोन महिन्यापासून लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली असून आतापर्यंत ३६ हजार ४०३ नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. दरम्यान, प्रारंभीच्या टप्प्यात मोजक्याच पाच ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत होती. आता दोन महिन्यानंतर तब्बल ७२ केंद्रांवर ही लस देण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लस घेणाऱ्यांचे प्रमाण झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. प्रत्येक केंद्रावर दररोज किमान १०० जणांना लस देण्याचे उदिष्ठ ठेवण्यात आले असून ते महत्तम पातळीवर पुर्ण झाल्यास प्रतिदिन ७ हजार २०० व्यक्तींना कोरोनाची लस जिल्ह्यात दिली जावू शकते.प्रारंभीच त्या पद्धतीने आराेग्य विभागाने नियोजन केले असले तरी टप्प्या टप्प्याने ही केंद्र सुरू करून केंद्रावर लसीकरणासाठी होणारी गर्दी नियंत्रीत करण्यात प्रशासनास यश आले आहे. दोन महिन्याच्या एकंदरीत आकडेवारीचा विचार करता जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या १.३५ टक्के नागरिकांना आतापर्यंत कोरोनाची लस देण्यात आलेली आहे. येत्या काळात लसीकरणाचा हा वेग आणखी वाढणार असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.
बुलडाणा जिल्ह्यात ३६ हजार नागरिकांचे कोरोना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 12:03 PM