- विवेक चांदूरकर लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस मिळणार असल्याचे शासनाने जाहीर केल्यावर २८ एप्रिल पासूनच हजारोंनी कोविन वेबसाईडवर नोंदणी केली. मात्र, लस केव्हा मिळणार याबाबत कुठलीही माहिती मिळत नसल्याने नोंदणी केलेले नागरिक संभ्रमात आहेत. जिल्ह्यातील ९५ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. सध्या कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली असून, सर्वांचीच लस घेण्यासाठी धडपड सुरू आहे. शासनाने १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देणार असून, त्याकरिता २८ एप्रिलपासून ऑनलाईन नोंदणी करण्याचे जाहीर केले. त्यानुसार २८ एप्रिलपासून दररोज हजारो नागरिक ऑनलाईन नोंदणी करीत आहेत. ऑनलाईन नोंदणी होत आहे. मात्र, नोंदणी केल्यानंतर लस केव्हा मिळणार याबाबत कोणतीही माहिती मिळत नाही. त्यामुळे नागरिक संभ्रमात पडले आहेत. २८ एप्रिलला नोंदणी केल्यानंतर दहा दिवस झाले तरी अनेकांना लस मिळाली नाही. नोंदणी केलेले अनेक नागरिक रूग्णालयात जात आहेत. मात्र, लसीचा साठा कमी असल्याने लस मिळत नाही. तसेच केव्हा मिळेल, याबाबतही सांगण्यात येत नाही. त्यामुळे त्यांना लस न घेताच परत यावे लागत आहे.
३० टक्के लस दुसरा डोस घेणाऱ्यांना लसीकरण केंद्रावर लस देण्याबाबत नियोजन केले असून उपलब्ध असलेल्या लसीपैकी ३० टक्के लस दुसरा डोस घेणाऱ्यांना देण्यात येते. उर्वरित पहिला डोस घेणाऱ्यांना देण्यात येते. यामध्ये नोंदणी केली असलेल्या व नसलेल्या १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्यात येते. ज्यांनी नोंदणी केली नाही, त्यांची लसीकरण केंद्रावर नोंदणी होते.
अॅपबाबत राज्य शासनाकडे आरोग्य विभागाची तक्रार कोविन ऑनलाईन अॅपवर लस केव्हा मिळणार याबाबत माहिती मिळत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. नोंदणी केल्यावर लसीकरणाची तारीख दाखविण्यात येत नाही. याबाबत जिल्हा परिषद आरोग्य विभागाने राज्य शासनाकडे तक्रार दिली असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे यांनी सांगितले. लाईनमध्ये उभे असलेल्यांना लस देण्यात येते. लाईनमध्ये असलेल्या नागरिकाने ऑनलाईन नोंदणी केली नसेल तर त्याची तत्काळ नोंदणी करण्यात येते. त्यानंतर लस दिल्या जाते. लसीचा तुटवडा आहे. तो सर्वत्रच आहे. - डॉ. बाळकृष्ण कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प., बुलडाणा