Corona Vaccination : शहरी भागातील नागरिकांची लसीकरणासाठी खेड्याकडे धाव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 10:48 AM2021-05-09T10:48:02+5:302021-05-09T10:48:13+5:30
Corona Vaccination : गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात लवकर मिळेल, हा मुद्दा हेरत शहरातील अनेकांनी ‘चलो गाव की अैार’चा नारा देत लसीचा लाभ घेण्याचा सपाटा सुरू केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव/नरवेल : ग्रामीण भागाच्या विविध गरजा शहरी भागावरच अवलंबून असल्याने त्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांची दैनंदिन शहराकडे धाव असते, त्याचवेळी गावातील लोकांनी आँनलाइन नोंदणी न केल्याने कोरोना प्रतिबंधक लस गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात लवकर मिळेल, हा मुद्दा हेरत शहरातील अनेकांनी ‘चलो गाव की अैार’चा नारा देत लसीचा लाभ घेण्याचा सपाटा सुरू केला आहे. खामगाव तालुक्यातील जलंब, मलकापूर तालुक्यातील नरवेल येथे हे प्रकार उघडकीस आले आहेत.
ही लस घेण्यासाठी फक्त ऑनलाईन नोंदणी करणारेच हजर असतात. नरवेल प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी शनिवारी नांदुरा , मलकापूर, मुक्ताईनगर जळगाव खान्देश तसेच इतर शहरातूनही नागरिक आल्यामुळे स्थानिकांचा लोकांचा रोष वाढला. ते पाहता दसरखेड एमआयडीसी पोलिसांना पाचारण करण्यात आले.
नरवेल प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत अकरा उपकेंद्र आहेत. त्यामध्ये ४३ गावे आहेत. त्या गावातील नागरिकांना लस मिळणे आवश्यक आहे. मात्र, शासनाने ऑनलाइन नोंदणी करून कुठेही लस घेऊ शकता, असे जाहीर केले. त्यामुळे नरवेल येथे बाहेरगावाच्या नागरिकांचा भरणा अधिक दिसून आला. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या ग्रामीण भागातील लोकांनी कुठे जावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी न करता फक्त स्पाँट रजिस्ट्रेशन करून घेण्याच्या सूचना शासनाने द्याव्या, अशी मागणी पुढे आली.
ऑनलाईन नोंदणी करून कोणी कुठेही लस घेऊ शकतो, असे शासनाने म्ह्टले आहे. सध्यातरी स्पाँट रजिस्ट्रेशन करण्याच्या कुठल्याच सूचना आतापर्यंत मिळालेल्या नाहीत. परंतु थोड्या जास्त प्रमाणात लस उपलब्ध झाल्यावर सोमवार ,मंगळवार पर्यंत स्पाँट रजिस्ट्रेशन करुन स्थानिक लोकांना प्राधान्य देणार आहोत.
- डॉ. रवींद्र गोफने, लसीकरण मोहिम अधिकारी, जि. प. बुलडाणा.
नोंदणीएवढे लसीकरण नाही
शनिवारी या केंद्रात नोंदणी केलेल्या १०० पैकी ९१ व्यक्तीच लसीकरणासाठी आल्या. उर्वरित नऊ लसी इतरांना देता येत नाहीत. त्यामुळे स्पाँट रजिस्ट्रेशनचा पर्याय देऊन लसीकरण करावे, अशी मागणी होत आहे.