Corona Vaccine : बुलडाणा जिल्ह्यात दुसऱ्या डोसबाबत धोरणात्मक निर्णयाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 11:53 AM2021-05-06T11:53:06+5:302021-05-06T11:53:12+5:30
Corona Vaccine: दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्यांची संख्या आता जिल्ह्यात एक लाखांपेक्षा अधिक झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात जवळपास साडेतीन महिन्यांपासून कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, पहिल्या डोससाठीच सर्वत्र धावाधाव आहे. आतापर्यंत केवळ ४३ हजार ४०७ व्यक्तींनाच दुसरा डोस जिल्ह्यात दिले गेले आहेत. त्यामुळे दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्यांची संख्या आता जिल्ह्यात एक लाखांपेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे यासंदर्भात त्वरित जिल्हास्तरावर धोरणात्मक निर्णय न घेतल्यास जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेत गोंधळ उडण्याची भीती व्यक्त होत आहे. वर्तमान स्थितीतच ५ एप्रिलपर्यंत पहिला डोस घेतलेल्या १ लाख ३९ हजार ८६९ नागरिकांपैकी तब्बल ९६ हजार ४६२ नागरिकांचा आठ आठवड्यांचा कालावधी संपुष्टात येत आहे. त्यादृष्टीने जिल्हास्तरावर नियोजन न झाल्यास प्रतिदिन जवळपास दहा हजार व्यक्तींची त्यात वाढ होत होऊन लसीकरण मोहिमेचे नियोजन कोलमडून पडण्याची शक्यता त्यामुळे ‘पुढे पाठ, मागे सपाट’ अशी स्थिती निर्माण होऊन लसीकरण मोहिमेत मोठा गोंधळच उडण्याची शक्यता आहे. त्यातच लसीचा पुरवठा हा मागणी आणि पुरवठ्याच्या व्यस्त प्रमाणात होत आहे. परिणामी पहिल्या व दुसऱ्या डोसमध्ये समतोल साधण्यासाठी व्यापक स्तरावर जिल्हा प्रशासनास दुसऱ्या डोसचा ड्यू आलेल्यांच्या लसीकरणास प्राधान्य द्यावे लागणार आहे. आगामी १५ दिवस तरी त्यास प्राधान्य द्यावे लागेल.
७० टक्के साठा दुसऱ्या डोससाठी
यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करताना उपलब्ध डोसपैकी ७० टक्के साठा दुसऱ्या डोससाठी वापरण्याच्या सूचना प्राप्त झाल्या असल्याचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी आर. जे. सांगळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. मात्र, निर्माण झालेली तफावत ही मोठी आहे. त्यामुळे दुसऱ्या डोसलाच प्राधान्य देण्याची गरज सध्या असल्याचे माजी आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी अधोरेखित केले. दुसरीकडे आठवड्यातील दोन दिवस दुसऱ्या डोससाठी ठेवण्याबाबतही प्रशासनस्तरावर सध्या विचार मंथन सुरू आहे.