कोरोना रिक्त बेडची संख्या कळणार एका क्लिकवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:29 AM2021-05-03T04:29:01+5:302021-05-03T04:29:01+5:30
बुलडाणा : शहरातील रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी किती बेड उपलब्ध आहेत, याची माहिती एका क्लिकवर देणारे मोबाईल ॲप स्वाभिमानी शेतकरी ...
बुलडाणा : शहरातील रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी किती बेड उपलब्ध आहेत, याची माहिती एका क्लिकवर देणारे मोबाईल ॲप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, त्यांचे सहकारी नंदू ऐंडोले आणि हर्षीद कोचर यांनी २ मे रोजी लॉन्च केले. कुठलाही व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता हे ॲप नागरिकांना माहिती देणार आहे.
बुलडाणा शहरात जिल्ह्यातील गंभीर रुग्णांवर उपचार करण्यात येतात. बेडसाठी रुग्णांच्या नातेवाइकांची मोठी धावपळ होते. ती टाळण्यासाठी हे ‘ग्रोसरी’ नावाचे ॲप विकसित करण्यात आले असून, कोरोना संसर्गाच्या काळात त्याचा फक्त बेडच्या उपलब्धतेसाठीच वापर होणार असल्याचे तुपकर यांनी सांगितले. बुलडाणा शहरातील खासगी रुग्णालयांचा यामध्ये समावेश करण्यात आला असून, शासकीय कोविड समर्पित रुग्णालयांची अद्ययावत माहितीही येत्या काही दिवसांत या ॲपमध्ये देण्यात येणार असल्याची माहिती रविकांत तुपकर, नंदू ऐंडोले आणि हर्षद कोचर यांनी दिली. गेल्या आठवड्यापासून यावर काम सुरू होते. या संदर्भात बुलडाणा शहरातील सर्व डॉक्टरांशी चर्चा करून हे ॲप बनविण्यात आले असून, त्यामध्ये आयसीयू, ऑक्सिजन आणि साधे बेड किती उपलब्ध आहे, याची माहिती मिळणार आहे. हाताळण्यासाठी हे ॲप अत्यंत सोपे असल्याचेही त्यांनी सांगितले.
अैाषधे, रेमडेसिविर आणि बेड उपलब्धतेचा जिल्ह्यात तुटवडा आहे. त्या पार्श्वभूमीवर हे ॲप विकसित करून त्याद्वारे रुग्णालयात उपलब्ध असलेल्या बेडची माहिती दिली जाणार आहे. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील अन्य रुग्णालयांचाही यात समावेश करण्यात येणार असल्याचे तुपकर यांनी सांगितले.