खामगाव ठरतेय कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 12:04 PM2020-07-13T12:04:17+5:302020-07-13T12:04:26+5:30
गत चार दिवसात ६० रूग्ण पॉझिटीव्ह आढळले असून, रूग्णसंख्येने शतक पार केले आहे.
- विवेक चांदूरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: जिल्ह्यात आतापर्यंत मलकापूर हॉटस्पॉट होते. मात्र आता मलकापूरपेक्षा खामगावमधील रूग्णसंख्या वाढत असून खामगाव तालुका हॉटस्पॉट झाला आहे. गत चार दिवसात ६० रूग्ण पॉझिटीव्ह आढळले असून, रूग्णसंख्येने शतक पार केले आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसात आणखी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या ४८२ झाली आहे. जिल्ह्यात आधी मलकापूरमध्ये रूग्णांची संख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे मलकापूर जिल्ह्यातील हॉटस्पॉट ठरले होते. आता मात्र खामगावात रूग्णांची संख्या वाढत आहे. खामगावात ३ एप्रिल रोजी सर्वात पहिला रूग्ण आढळला होता. त्यानंतर ७ एप्रिल रोजी दुसरा रूग्ण आढळला. त्यानंतर २१ मे रोजी ८ रूग्ण आढळले होते. त्यानंतर एक- दोन रूग्ण आढळत होते. १८ जून दरम्यान जिल्ह्यात एकही पॉझिटीव्ह रूग्ण नव्हता. मात्र गत चार दिवसांपासून रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. १० जुलै रोजी १३ रूग्ण पॉझिटीव्ह आढळले तर ११ जुलै रोजी पुन्हा १३ रूग्ण आढळले आहेत. १२ जुलै रोजी २० रूग्ण पॉझिटीव्ह आढळले असून, रूग्णसंख्या आता ११० झाली आहे. मलकापूरमध्ये ८ एप्रिल रोजी पहिला रूग्ण आढळला होता. आतापर्यंत मलकापूरमध्ये ८० रूग्ण आढळले आहेत. मलकापूरमध्ये ८ जून रोजी ९ तर १२ जून रोजी १० रूग्ण आढळले होते. शहरातील अनेक नागरिक अकोला ये- जा करीत असल्यामुळे अकोल्यातील रूग्णांच्या संपर्कात आल्यामुळे कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. शहरातील बहूतांश भागात रूग्ण आढळत असल्याने कडक निर्बंध घालण्याची गरज आहे.
चार जणांचा मृत्यू
तालुक्यातील चार जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सर्वात पहिला मृत्यू १८ मे रोजी समन्वय नगरातील एका ६५ वर्षीय महिलेचा झाला होता. १ जुलै रोजी सतीफैलातील एका ९० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला तर ६ जुलै रोजी फाटकपुरा परिसरातील ८८ वर्षीय सेवानिवृत्त प्राध्यापकांचा मृत्यू झाला. ११ जुलै रोजी ८० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला.
खामगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात रॅपीड टेस्ट करण्यात येत आहे. रूग्णसंख्या सध्या वाढत असली तरी रॅपीड टेस्ट केल्यामुळे रूग्ण लवकर निदर्शनास येत आहे. परिणामी सदर रूग्ण दवाखान्यात भरती होत असून, प्रसार रोखण्यास मदत होत आहे. रॅपीड टेस्टमुळे सध्या रूग्ण वाढत असले तरी नंतर रूग्णसंख्या कमी होणार आहे.
- मुकेश चव्हाण, उपविभागीय अधिकारी, खामगाव