धक्कादायक ! स्वॅब न देताच कोरोनाचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 03:30 AM2021-03-07T03:30:16+5:302021-03-07T03:30:52+5:30
बुलडाण्यातील प्रकार; दोषींवर कारवाईची मागणी
मोताळा (जि. बुलडाणा) : स्वॅब न देताच एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचा धक्कादायक प्रकार येथील सहकार विद्या मंदिरातील कोविड केअर सेंटरमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
मोताळा येथील पंडितराव कैलासराव देशमुख हे २५ फेब्रुवारी रोजी सकाळी तपासणीसाठी मोताळा येथील कोविड केअर सेंटरला आले होते. या ठिकाणी त्यांचे नाव, पत्ता व मोबाइल क्रमांकाची नोंद घेण्यात आली. मात्र त्यांना स्वॅब देण्यासाठी दुपारी बोलावण्यात आले. परंतु पंडितराव पुन्हा कोरोना केंद्रात गेलेच नाहीत. दरम्यान, आठवडाभरानंतर शुक्रवार, ५ मार्च रोजी कोविड केअर सेंटरमधील कर्मचाऱ्याने पंडितराव देशमुख यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला व त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले. त्यामुळे देशमुख यांना धक्काच बसला. त्यांनी आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणावर बोट ठेवत संताप व्यक्त केला आहे.
‘तो’ स्वॅब दुसऱ्याचाच
या प्रकाराबाबत माहिती घेतली असता देशमुख यांनी नोंदणी केल्यावर स्वॅब घेण्यासाठी त्यांच्या नावाचा ट्युब तयार करण्यात आला होता. त्यात दुसऱ्याच व्यक्तीचा स्वॅब घेण्यात आला. त्याचा अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, आरोग्य विभाग पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचा शोध घेत आहे.
कोरोनाचा प्रार्दूभाव झाला नसतानाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने देशमुख यांना धक्क बसला असून त्यांनी कारवाईची मागणी केली आहे.