लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणाा : सलग दुसऱ्या दिवशी बुलडाणा जिल्ह्यात १५ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या २१३ वर पोहोचली आहे. दोन दिवसात ३० रुग्णांची भर जिल्ह्यात पडली आहे.रविवारी ३१ अहवाल जिल्हा प्रशासनास पात्र ठरले. त्यापैकी १६ अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये मलकापूरमधील ४० वर्षीय महिला, शेगावातील जोगडी फैलमधील एक महिला व काँग्रेसनगरमधील एक पुरुष तर वरवट बकाल येथील ५१ वर्षीय व्यक्तीचा यात समावेश आहे. आळसणा येथील सहा तर जळगाव जामोद मधील ५३, ५६ आणि ६७ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहेत. संग्रामपूर तालुक्यातील निवाना येथेही ३४ व ३६ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, शेगावातील जोगडी फैल, नांदुरा येथील एक, मलकापुरमधील पारपेट, पातुर्डा येथील तीन जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता १४४ वर पोहोचली आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यात ६८ टक्क्यांवर पोहोचले आहे.अद्याप १२६ अहवाल अकोला येथील प्रयोग शाळेतून अप्राप्त आहे. दरम्यान, आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांपैकी दोन हजार ४३४ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीतांची संख्या २१३ झाली असून त्यापैकी १४४ जण कोरोना मुक्त झाले असल्याने प्रत्यक्षात ५८ सक्रीय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ११ कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी दिली. आळसणा येथे सहा जण निघाले पॉझिटिव्हशेगाव तालुक्यातील आळसणा येथे तब्बल सहा जण पॉझिटिव्ह आले आहे. पातुर्ड्याप्रमाणेच आता येथे कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे. आळसणा येथे ४५, ७२ वर्षीय महिला, १६ वर्षांची मुलगी, १८ वर्षाचा तरुण, ११ वर्षाचा मुलगा आणि ३३ वर्षीय एका व्यक्तीचा समावेश आहे. एकाच दिवशी येथे सहा कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आळसणा येथेही जनता कर्फ्यु लावण्याची गरज निर्माण झाली आहे. शेगावातही दोन जण कोरोना बाधीत आढळून आले आहेत.
CoronaVirus : बुलडाण्यात आणखी १५ पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या २१३
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 11:07 AM