CoronaVirus in Buldhana : कोरोना बाधीत चौघांचीही प्रकृती स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 06:24 PM2020-04-03T18:24:34+5:302020-04-03T18:24:42+5:30
आरोग्य तपासणीत गेल्या चार दिवसात कोरोना संसर्गाचे एकही लक्षण आढळून आलेले नाही.
- नीलेश जोशी
बुलडाणा: पश्चिम वºहाडातील कोरोना संसर्गाने पहिला मृत्यू झालेल्या बुलडाणा शहरातील कोरोना पॉझीटीव्ह असलेल्या अन्य चौघांची प्रकृती हि स्थिर असून त्यांच्या आरोग्य तपासणीत गेल्या चार दिवसात कोरोना संसर्गाचे एकही लक्षण आढळून आलेले नाही. विशेष म्हणजे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील तीन व संपर्कात आलेल्या एकाचा यामध्ये समावेश आहे.
बुलडाणा शहरात २८ मार्च रोजी एका ४७ वर्षीय शिक्षकाचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला होता. त्याच्या संपर्कातील ६६ जणांना हॉस्पीटल क्वारंटीन तर काहींना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यापैकी ३२ जणांचे स्वॅब नमुने हे नागपूर येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी चार जणांचे नमुने हे पॉझीटीव्ह आले होते. त्यात मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एका वृद्ध व्यक्तीसह दोन अल्पवयीन मुलांचा समावेश होता. तर वैद्यकीय कारणावरून मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या एकाचा स्वॅब नमुना पॉझीटीव्ह आल्याने त्यास आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले होते. या चारही जणांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यामध्ये कोरोना संसर्गामध्ये दिसणारी लक्षणे अद्याप दिसली नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंदर पंडीत यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे मृत व्यक्तीच्या हायरिस्क संपर्कातील हे व्यक्ती होते. सुदैवाने अद्याप त्यांच्यात तशी कुठलीही लक्षणे दिसून आलेली नाहीत.
लो रिस्कमधील जवळपास ३१ जण सध्या इन्स्टीट्यूट क्वारंटीन असून त्यांच्यामध्येही अद्याप तशी कुठलीही लक्षणे दिसलेली नाहीत. दुसरीकडे मृत व्यक्तीच्या संपर्कात आल्याने चार जण पॉझीटीव्ह झाले असले तरी ही संख्या कमी असल्याने त्याचे ट्रेसींग करणे आपल्याला शक्य होत आहे, ही एक दिलासा देणारी बाब आहे.
दुसरीकडे दक्षीण दिल्लीमधील एका धार्मिक स्थळी कार्यक्रमात सहभागी झालेल्या १७ जणांचे स्वॅब नमुने नागपूर येथे पाठविण्यात आलेल आहेत. त्याचे अहवाल आल्यानंतर खºया अर्थाने जिल्ह्यात कम्युनिटी स्प्रेडचा धोका आहे किंवा नाही हे स्पष्ट होईल. तुर्तास तरी बुलडाणा जिल्ह्यातील स्थिती स्टेबल असल्याचे चित्र आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांना याबाबत छेडले असता त्यांनी स्पष्ट केले.
त्या ५६ जणांचीही ट्रिटमेंट सुरू
बुलडाणा शहरातील हायरिस्क क्षेत्रात मोडणाºया १२ नगरामधील ५६ व्यक्तींना सर्दी, ताप असल्याचे समोर आले आहे. त्यांची आपण ट्रिटमेंट सुरू केली आहे. त्यांच्या या किरकोळ समस्या आहेत. तरीही आपण त्यांच्यावर लक्ष ठेवून असून त्यांना असलेला सर्दी, ताप किरकोळ स्वरुपाचा आहे. त्यात फारसी काही अडचण नाही. त्या व्यक्ती कोरोनाचे संदीग्ध रुग्ण असल्याचे वाटत नाही, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
अॅक्टीव सर्व्हीलन्स व तपासणीला सहकार्य
शहरातील २४ हजार व्यक्तींची तपासणी करण्यात येत असून या भागात ९० पथकाद्वारे अॅक्टीव सर्व्हीलन्स सुरू आहे. प्रारंभी या तपासणीला झालेला विरोध पाहता आता एकंदरीत चित्र कसे आहे, याबाबत विचारणा केली असता संबंधित नागरिकांचे सहकार्य मिळत आहे आणि अॅक्टीव सर्व्हीलन्सला वेग आला आहे.