CoronaVirus In Buldhana : आणखी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह; रुग्णांची संख्या चारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 10:11 AM2020-04-01T10:11:36+5:302020-04-01T10:13:18+5:30
आतापर्यंत बुलढाणा शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या चार झाली आहे.
बुलढाणा: कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला आणखी एक रुग्ण बुलढाणा मध्ये सापडला आहे. नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या बत्तीस नमुन्यांपैकी आणखी एका नमुन्याचा अहवाल बुधवारी सकाळी प्राप्त झाला तो पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे बुलढाणा मध्ये गेल्या दोन दिवसापासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे आतापर्यंत बुलढाणा शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या चार झाली आहे. पैकी एका रुग्णाचा 28 मार्च रोजी मृत्यू झाला होता. दरम्यान त्यानंतर या मृत व्यक्तीच्या संपर्कातील तथा कुटुंबातील जवळपास 66 जणांना हॉस्पिटल कुवारंटी करण्यात आले होते. त्यापैकी निकट संपर्कात असलेल्या बत्तीस जणांचे स्वाब नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी मृतकाच्या कुटुंबातील दोघांचे अहवाल 31 मार्च रोजी पॉझिटिव्ह आले होते. तर आज मृत व्यक्तीच्या संपर्कातील 23 वर्षीय व्यक्तीचा स्वाब नमुन्याचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. दुसरीकडे अकोला येथील आरोग्य उपसंचालक डॉक्टर आर .एस. फारुकी यांनी 31 मार्च रोजी बुलढाणा शहरास भेट दिली . सोबतच हाय रिस्क झोनची ही त्यांनी पाहणी केली. यावेळी या क्षेत्रातील सोळा हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. बुलढाणा येथून 29 मार्च रोजी पाठविण्यात आलेल्या 32 स्वाब नमुन्यांपैकी अद्याप आठ नमुन्यांचे अहवाल येणे बाकी आहेत. ते बुधवारी सायंकाळपर्यंत मिळण्याची शक्यता असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रेमचंद पंडित यांनी सांगितले.