CoronaVirus in Buldhana : दोघांचा मृत्यू; बाहेर जिल्ह्यात सुरू होते उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 11:12 AM2020-08-08T11:12:38+5:302020-08-08T11:13:08+5:30
साखरखेर्डा आणि मेहकर येथील दोन व्यक्तींचा कोरोनामुळे अनुक्रमे औरंगाबाद आणि जालना येथे मृत्यू झाला आहे.
मेहकर/ सिंदखेडराजा: सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा आणि मेहकर येथील दोन व्यक्तींचा कोरोनामुळे अनुक्रमे औरंगाबाद आणि जालना येथे मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोना बाधीतांचा मृत्यू होण्याचे प्रमाण जिल्ह्यात अलिकडील काळात वाढत आहे.
साखरखेर्डा येथील एकावर औरंगाबाद येथे उपाचर सुरू होते. ८० वर्षीय या वृद्धा सात जुलै रोजी तेथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. साखरखेर्डा येथील वयोवृद्धाची बुलडाणा येथे तपासणी करण्यात आल्यानंतर त्यास औरंगाबाद येथे हलविण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान ह्रदय विकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, साखरखेर्डा येथील २० बाधीत रुग्ण बरे झाल्याने त्यांना आतापर्यंत रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. साखरखेर्डा येथे सध्या कडकडीत जनता कर्फ्यु पाळण्यात येत आहे. दुसरीकडे सिंदखेड राजा येथील एक व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने त्याच्यावर जालना येथे उपचार सुरू होते. त्याचा मुलगा त्यास भेटायला गेला असता तोही तपासणीत पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
दरम्यान, मेहकर येथील एका महिलेचाही जालना येथे मृत्यू झाला आहे. स्थानिक एका महाविद्यालयातून सेवानिवृत्त झालेली ही महिला ६५ वर्षाची होती.
कोरोना झाल्यामुळे जालना येथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. दरम्यान गुरूवारीच त्यांचे निधन झाले. एक आॅगस्ट रोजी त्या पॉझिटिव्ह आल्या होत्या.