CoronaVirus in Buldhana : समूह संक्रमण सुरू झाल्याची भीती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 11:30 AM2020-03-31T11:30:52+5:302020-03-31T11:31:35+5:30
जिल्ह्यात ८१४ ठिकाणे निश्चित करण्यात आली असून तेथे चार हजार ७७ नागरिकांना क्वारंटीन केल्या जाऊ शकते.
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोना संसर्गाने मृत्यू पावलेल्या रुग्णाच्या निकटवर्तीयांचे आरोग्य विभाग मॉनिटरींग करत असून हाय रिस्क झोनमध्ये मोडणाऱ्या बुलडाणा शहरातील ईशान्य भागात प्रामुख्याने आरोग्य विभागाच्या पथकाद्वारे सध्या तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे.
दरम्यान, कोरोना संसर्गाच्या मृत्यूमुळे आता बुलडाणा शहर परिसरात कोरोना विषाणूचे समुह संक्रमण होण्याची भीती वाढली आहे. त्यामुळे प्रशासन ही अलर्ट मोडवर आहे. पोलिस प्रशासनानेही शहराची चारही बाजूंनी नाकेबंदी केली असून मृत व्यक्ती गेल्या १५ ते २० दिवसात कोणाच्या संपर्कात आला होता तथा त्याला भेटावयास गेलेल्या नागरिकांचीही माहिती काढण्यात गुंतला असल्याचे चित्र ३० मार्च रोजी दिसून आले.
बुलडाणा जिल्ह्यात आगामी काळातील संभाव्य धोका पाहता जिल्हा प्रशासनाने प्रसंगी संशयीत व्यक्तींना मोठ्या प्रमाणावर क्वारंटीन करण्याची गरज पडल्यास जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांसह काही संस्थांच्या जागांची निवड केली असून त्या ठिकाणी नागरिकांना ठेवण्याच्या दृष्टीने सज्जता केली आहे. अशी जिल्ह्यात ८१४ ठिकाणे निश्चित करण्यात आली असून तेथे चार हजार ७७ नागरिकांना क्वारंटीन केल्या जाऊ शकते. दरम्यान, बुलडाणा शहरात सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेदरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू असून तीन नंतर पोलिस प्रशासन या सेवा बंद करण्यासाठी थेट संबंधीतांच्या दुकानावर जात आहे. उद्घोषकाद्वारेही जाहीर आवाहन करून नागरिकांना त्याबाबत समज दिल्या जात आहे.
बुलडाण्यातील मृत्यूमूळे समूह संक्रमण सुरू झाल्याची भीती
बुलडाणा शहरात कोरोनाचे समूह संक्रमण (कम्युनिटी स्प्रेड) होण्याची भिती निर्माण झाली आहे. मात्र काही नागरिक अद्यापही याबाबत गंभीर नसल्याचे चित्र ३० मार्च रोजी बुलडाणा शहरात दिसून आले. त्यानुषंगानेच बुलडाणा शहरात आरोग्य विभागाने सर्व्हीलन्स (पाळत ठेवणे) सुरू केले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी दिली. सध्या नागरिकांची तपासणी सुरू असून रात्री उशिरा त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शहरातील एकंदरीत स्थितीचे गांभिर्य निदर्शनास येऊ शकले.
दोन डॉक्टरांचेही स्वॅब नमुने पाठवले!
शहरातील एकंदर परिस्थिती पाहता सध्या शासकीय कार्यालयांमध्ये रक्तदान शिबीर घेण्यात येत आहे. त्यामुळे काही डॉक्टरांचा सार्वजनिकस्तरावर संपर्क येत आहे. प्रसंगी हे डॉक्टर कोरोना विषाणूचे वाहक होऊ शकतात. त्यानुषंगाने खबरदारी म्हणून दोन डॉक्टरांचेही स्वॅब नमुने ही नागपूर येथे प्रयोग शाळेत तपाणीसाठी पाठवले आहेत.
बुलडाणा शहरात आरोग्य विभागाच्या पथकांद्वारे सर्व्हीलंस सुरू करण्यात आले आहे. कम्युनिटी स्प्रेडचा धोका पाहता उपाययोजना हाती घेण्यात आला आहे. रात्री उशिरा दिवस शहरात करण्यात आलेल्या तपासण्याच्या अहवालाअंती काही बाबी स्पष्ट होऊ शकतात.
डॉ. प्रेमचंद पंडीत, जिल्हा शल्यचिकित्स बुलडाणा