बुलडाणा: जिल्हा सामान्य रुग्णालयात क्वॉरंटाईनमध्ये सकाळी ठेवण्यात आलेल्या एका व्यक्तीचा अवघ्या तासाभरातच उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनीही त्यास दुजोरा दिला आहे. मृत पावलेल्या व्यक्तीला निमोनिया झाला होता. तो अधिक वाढल्यामुळे त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात क्वॉरंटाईन कक्षात दाखल करण्यात आले होते.मृत पावलेल्या व्यक्तीस कोरोनाचा संसर्ग झाला होता की नाही, ही बाब अद्याप अस्पष्ट आहे. प्रकरणी या मृत व्यक्तीचे स्वॅब नमुने ‘हार्ड अॅन्ड फास्ट’ तत्वावर नागपूर येथे पाठवण्यात आले आहे. हे नमुने सायंकाळी सातच्या सुमारास नागपूर येथे पोहोचतील. त्यानंतर या व्यक्तीच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल. मृत व्यक्ती ही बुलडाणा शहरातीलच असून ती वयोवृद्ध नव्हती. बुलडाणा शहरातीलच एका खासगी रुग्णालयामध्ये गेल्या दोन दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्याचा निमोनिया अधिकच वाढत गेला. त्यामुळे त्याची प्रकृती ढासळली होती. आज सकाळी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे तो क्वॉरंटाईनमध्ये असतानाच तासाभरात त्याचा मृत्यू झाला. प्रकरणी खबरदारीची उपाययोजना म्हणून त्याचे स्वॅब नमुने तातडीने नागपूर येथे विषाणू तपासणी प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच या बाबत स्पष्टपणे काही सांगता येईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंदर पंडित यांनी स्पष्ट केले. यापूर्वीही बुलडाणा जिल्ह्यात परदेशवारीवरून आलेल्या एका वयोवृद्धाचा क्वॉरंटाईनमध्ये असताना मृत्यू झाला होता. कोरोना संसर्गामुळे त्याचा मृत्यू झाला नसल्याचे नंतर स्पष्ट झाले होते.दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात आलेल्या ९२ परदेशी नागरिकांची तपासणी करण्यात आलेली असून यापूर्वी नागपूर येथे पाठवण्यात आलेल्या ११ जणांचे स्वॅब नमुनेही निगेटीव्ह आले होते. मात्र आता जिल्हा रुग्णालयात क्वॉरंटाईनमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनीही स्वत:च्या बचावासाठी ‘स्टे होम’ या गोल्डन रुलचे पालन करणे गरजेचे झाले आहे.
३९ हजार नागरिक होम क्वॉरंटाईनपुण्या-मुंबईसह अन्य महानगरातून बुलडाणा जिल्ह्यात दाखल झालेल्या ३९ हजार नागरिकांना होम क्वॉरंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिला आहे. दरम्यान, यापैकी दहा हजार नागरिकांच्या हातावर होम क्वॉरंटाईनचे शिक्केही मारण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे.