लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गेल्या चार दिवसापासून झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत मंगळवारी काहीशी घट होऊन अवघे पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान जळगाव खान्देशमधील देऊळगाव गुजरी येथील एका ५४ वर्षीय महिलेचा आयसोलेशन कक्षात २९ जून रोजी मध्यरात्री मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या आता १२ वर पोहोचली आहे.अकोला येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अहवालांपैकी ९५ अहवाल मंगळवारी प्राप्त झाले. यापैकी ९० अहवाल हे निगेटीव्ह आले असून पाच अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवालामध्ये शेगाव तालुक्यातील आळसणा येथील ५० वर्षीय पुरुष, जळगाव खान्देश जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात येत असलेल्या देऊळगाव गुजरी येथील ५४ वर्षीय महिला, अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील रेलूम येथील मूळ पत्ता असलेला ६५ वर्षीय व्यक्ती आणि चिखली तालुक्यातील कोलारा येथील ६७ वर्षीय महिला रुग्णाचा यात समावेश आहे. दरम्यान, देऊळगाव गुजरी येथील महिलेचा बुलडाणा आयसोलेशन कक्षात उपचारादरम्यान २९ जून रोजी रात्री मृत्यू झाला. या ५४ वर्षीय महिलेवर देऊळगाव गुजरी येथील त्यांच्या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.दुसरीकडे पाच कोरोना बाधीत रुग्ण ३० जून रोजी कोरोना मुक्त झाले आहेत. त्यांना वैद्यकीय संकेतानुसार सुटी देण्यात आली आहे. त्यात मलकापूर येथील भीमनगरमध्यील ४५ वर्षीय व्यक्ती, मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथील २२ , २५ वर्षीय महिला आणि ६५ वर्षीय पुरुष व पाच वर्षीय मुलीचा समावेश आहे.दरम्यान, आजपर्यंत दोन हजार ६०१ संदिग्ध व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. सोबतच आजपर्यंत १५२ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. ३० जून रोजी ९५ अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्या पैकी ९० अहवाल निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीतांची संख्या आता २३५ झाली आहे. पैकी १५२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे सध्या जिल्ह्यात ७१ कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. दुसरीकडे आतापर्यंत १२ कोरोना बाधीत व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी दिली.
५ दिवसात ६५ रूग्णजिल्ह्यात गेल्या ५ दिवसात मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. २६ जूनला १३, २७ जून १५, २८ जून १५, २९ जून १७ तर ३० जून रोजी ५ कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.