खामगावकरांना दिलासा: ‘त्या’ मृत महिलेचा अहवाल निगेटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 06:45 PM2020-04-11T18:45:56+5:302020-04-11T18:46:49+5:30
उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्या ६३ वर्षीय महिलेच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.
बुलडाणा: खामगाव येथील आयसोलेशन कक्षात उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्या ६३ वर्षीय महिलेच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रासह बुलडाणेकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ‘सारी’ आजार सदृश्य लक्षणे आणि श्वसनाचा त्रास होत असल्याने या महिलेस १० एप्रिल रोजी खामगाव आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले होते. मात्र अवघ्या दोन तासातच या महिलेचा मृत्यू झाला होता. दरम्यान, शेगाव व खामगाव येथील आयसोलेशन कक्षातील ११ जणांनाही त्यांच्या दुसºया चाचण्या निगेटीव्ह आल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
प्रकरणी मृत महिलेला कोरोना संसर्गतर झाला नव्हता ना? या बाबत संदिग्धता निर्माण झाली होती. ती राहू नये म्हणून आरोग्य विभागाने मृत महिलेचे स्वॅब नमुने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविले होते. सुदैवाने या महिलेचा स्वॅब नमुन्याचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. दरम्यान, या महिलेच्या पार्थिवावर तिच्या गावानजीकच शेतात आरोग्य विभागाच्या व सध्या सुरू असलेल्या साथीच्या पार्श्वभूमीवर प्रोटोकॉल नुसार अंत्यसंस्कार करण्यात आले होते, असे वैद्यकीय सुत्रांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे खामगाव येथील आयसोलेशन कक्षातील दोन आणि शेगाव येथील आयसोलेशन कक्षातील नऊ अशा ११ जणांनाही त्यांच्या कोरोना संसर्गाबाबतच्या दुसºया चाचण्या निगेटीव्ह आल्यामुळे ११ एप्रिल रोजी सुटी देण्यात आली आहे. १७ रुग्ण आढळलेल्या बुलडाणा जिल्ह्याच्या दृष्टीने ही मोठी दिलासादायक बाब म्हणावी लागले. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेगाव व खामगाव येथील एकूण ११ जणांना कोरोनाचे संदिग्ध रुग्ण म्हणून आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यावेळही त्यांचे अहवाल निगेटीव्ह आले होते. दरम्यान, दुसºयांदा पुन्हा त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्याही निगेटीव्ह आल्या होत्या. यासंदर्भात आरोग्य विभागाने संपूर्ण बाबींची खातरजमा केल्यानंतर खामगावातील दोघे व शेगावातील नऊ जणांना अखेर आयसोलेशन कक्षातून सुटी केली. बुलडाणा जिल्ह्याच्या दृष्टीने ही मोठी सकारात्मक बाब म्हणावी लागले.
चितोड्यातील संशयीताचा नमुना पाठवला
खामगाव तालुक्यातील चितोडा येथील एका संशयीताचा नमुनाही तपासणीसाठी पाठविण्यात आला असल्याची माहिती आरोग्य विभागातील सुत्रांनी दिली. संबंधीत व्यक्तीत संसर्गाशी साधर्म्य दाखविणारी काही लक्षणे आढळल्यामुळे त्याचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. दुसरीकडे नागपूर येथील प्रयोग शाळेत विदर्भातून गेलेल्या जवळपास ७०० नमुन्यांची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती. अकोला येथील लॅब सुरू झाल्यानंतर नागपूरचा लोड बराच कमी होण्यास मदत मिळणार आहे.