- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या १०५ दिवसात विदेशातून जिल्ह्यात स्वगृही तब्बल २२४ नागरिक परतले असून यापैकी सहा नागरिक हे कोरोना बाधीत असल्याचे समोर आले आहे. गेल्या एक आठवड्यातच हे सहा नागरिक जिल्ह्यात दाखल झाले असून हे सर्व नागरिक किर्गीस्तानची राजधानी बिश्केक येथून आल्याची माहिती समोर येत आहे.परदेशातून आलेल्या नागरिकांपैकी जवळपास तीन टक्के नागरिक पॉझिटिव्ह आले असल्याचे आतापर्यंतची आकडेवारी सांगते. जिल्ह्यात १२ मार्च २०२० रोजी संसर्ग रोग प्रतिबंधक अधिनियम आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला होता. त्यानंतर २३ मार्च रोजी लॉकडाऊन सुरू झाला होता. जूनमध्ये त्यात बऱ्याच अंशी शिथीलता देण्यात आली. दरम्यान १२ मार्च पासून आजपर्यंत बुडाणा जिल्ह्यात २२४ नागरिक विदेशातून जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यापैकी ११९ नागरिक हे मे महिन्याच्या अगोदर जिल्ह्यात दाखल झाले असले तरी त्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वंदे भारत मिशन अंतर्गत परदेशात अडकलेल्या नागरिकांना स्वदेशात आणण्याची मोहिम केंद्र सरकारने हाती घेतली होती. या मोहिमेतंर्गत आतापर्यंत २२२ फ्लाईट देशात आलेल्या आहेत. त्यातंर्गत बुलडाणा जिल्ह्यात १०५ नागरिक परदेशातून आल्या आहेत. त्यापैकी सहा जणांना कोरोनाची लागण असल्याचे स्पष्ट झाले आहे.
CoronaVirus : विदेशातून बुलडाणा जिल्ह्यात परतलेले सहा प्रवाशी पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 11:14 AM