Coronavirus : मलकापूरमध्ये एकाच कुटुंबात आढळले तीन पॉझिटिव्ह;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 9:05 PM
मलकापूरमध्ये एकाच कुटुंबात आढळले तीन कोरोना पॉझिटिव्ह.
लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचा आकडा सातत्याने वाढत असून मलकापूर शहरता ३० मे रोजी सायंकाळी पुन्हा तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. परिणामी बुलडणा जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ५९ वर पोहोचली आहे.मलकापूर शहरातील भीमनगर भागात दुसºया टप्प्यात जो कोरोना बाधीत रुग्ण आढळून आला होता. त्याच्या घरानजीकच एकाच कुटुंबातील तिघे जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये संबंधित घरातील पुरूष, महिला व एक दहा वर्षाचा मुलगा यांचा समावेश आहे.परिणामी मलकापूर शहरात म्हणता म्हणता कोरोना संसर्गाचे आता सात रुग्ण झाले आहेत. दुसरीकडे भीमनगरमधील कोरोना बाधीत व्यक्ती तथा गेल्या दोन दिवसात आढळून आलेल्या कोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा आता शोध घेवून त्यांना बुलडाणा येथे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. जळका भडंग येथे एकाच दिवशी ज्या प्रमाणे आठ कोरोना बाधीत आढळून आले होते, तशी स्थिती मलकापूरमध्ये बनते की काय? अशी भिती व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर यंत्रणा आता अधिक सजग झाली आहे. दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात बाहेर गावाहून आलेल्या व्यक्ती कोरोना बाधीत आढळून येत होत्या. मात्र आता मलकापूर शहरात त्याचा स्थानिक संसर्ग सुरू झाली अशी शंका व्यक्त होत आहे. परिणामी मलकापूर शहरात आता समूह संक्रमणाचा धोका निर्माण झाला आहे. शहरातील जवळपास ३७ जणांना क्वारंटीन करण्यात आले आहे.कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे बुलडाणा जिल्ह्याचे प्रमाण आता त्यामुळे घटले असून ५८ टक्क्यावरून ते आता ५४ टक्क्यावर आले आहे. जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ५९ झाली असून त्यापैकी ३३ रुग्ण बरे झाले आहे. मात्र जिल्ह्यात सातत्याने वाढणारे रुग्ण पाहता लॉकडाउनची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे