लोकमत न्यूज नेटवर्कशेगांव : खामगावातील जिया कॉलनीतील कोरोना पॉझिटिव्ह महिलेची शेगावातील एका रुग्णालयात प्रारंभी तपासणी करण्यात आल्याने हे हॉस्पीटल रविवारी सील करण्यात आले असून, या रुग्णालयातील डॉक्टरसह सहा जणांना क्वारंटीन करण्यात आले आहे. त्यामुळे शेगावकरांना पुन्हा एकदा दुहेरी झटका बसला आहे. खामगाव शहरातील जिया कॉलनीमधील एक महिला १६ मे रोजी पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते. ही महिला तिच्या नातेवाईकासह ११ मे रोजी खामगाव शहरात राहण्यासाठी आली होती. दरम्यान, १३ मे रोजी या महिलेची प्रकृती खराब झाल्याने तिला शेगाव येथील एका हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आजारी असलेल्या महिलेमध्ये आढळून आलेली लक्षणे पाहता त्यांची कोवीड-१९ ची चाचणी करण्याचा सल्ला देण्यात आला होता. शेगावातील नवीन बाजार समितीच्या पाठीमागील बाजूस हे हॉस्पीटल असून त्याच्या लगत एक जिनींगही आहे. दरम्यान, या महिलेस १४ मे रोजी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी नेले असता तेथील आयसोलेशन कक्षात त्यांना दाखल करून घेण्यात येऊन त्यांचा स्वॅब नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता.१६ मे रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खामगाव शहरात खळबळ उडाली होती. त्यामुळे जिया कॉलनीसह लगतचा सर्वच परिसर सील करण्यात आला. पॉझिटिव्ह आलेल्या महिलेच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्यात येत असताना शेगावातील एका खासगी रुग्णालयाचा संदर्भ आला. त्यानुषंगाने शेगाव येथील पालिका मुख्याधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आल्यानंतर शेगाव येथील संबंधित हॉस्पीटल सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने शेगावात पुन्हा खळबळ उडाली होती. दरम्यान, आता पुढील आदेशापर्यंत हे हॉस्पीटल बंद ठेवण्यात येणार आहे. सोबतच कोरोना बाधीत महिलेच्या संपर्कात आलेल्या डॉक्टरसह रुग्णालयातील सहा जणांना सईबाई मोटे रुग्णालयात क्वारंटीन करण्यात येऊन त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी अकोला पाठविण्यात आले असल्याचे सुत्रांनी सांगितले. अकोला येथील प्रयोग शाळेकडून १८ मे रोजी त्यांचे अहवाल प्राप्त होण्याची शक्यता आहे. शेगावातील ‘त्या’ सफाई कामगाराच्या संपर्कातील २३ जण क्वारंटीनशेगाव पालिकेत सफाई कामगार पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कातील २३ जणांना क्वारंटीन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने बाधीत व्यक्तीचे नातेवाईक व त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा समावेश आहे. यात प्रामुख्याने रामदेव बाबा नगरमधील व्यक्तींचा समावेश आहे. पालिकेत सफाई कामगार असलेला हा ३५ वर्षीय व्यक्ती १६ मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. क्वारंटीन करण्यात आलेल्यांपैकी हायरिस्क कॉन्टॅक्टमधील व्यक्तींचे स्वॅब नमुने तपासणीस पाठविण्यात येणार आहेत.
CoronaVirus : तपासणी केलेल्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह; शेगावातील हॉस्पिटल सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 6:00 PM