बुलडाणा : वर्तनाचा अभ्यासक्रम शालेय शिक्षणात अंतर्भूत नसल्याने देश व राष्ट्राची ओळख नसलेल्या युवा पिढीला तसेच वंचित समाजाला माणसाला माणूस घडविणाºया बुध्द व आंबेडकरी तत्वज्ञानाची ओळख देत आत्मभान जागृत करणारे डॉ. गंगाधर पानतावणे हे दलित आंबेडकरी चळवळीचे खरे भाष्यकार होते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध विचारवंत, संशोधक व समिक्षक प्राचार्य डॉ. किसन पाटील यांनी येथे केले. स्थानिक जिजामाता महाविद्यालयाच्या सभागृहात ४ आॅगस्ट रोजी स्थानिक परिवर्तनवादी साहित्यीक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने आयोजित अस्मितादर्शकार प्रा. डॉ. गंगाधर पानतवणे व्यक्तित्व, कर्तृत्व अन् नेतृत्व या विषयावर प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिजामाता महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. अशोक इंगळे हे होते. जिल्हा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे, प्रसिध्द दंतशल्यचिकित्सक डॉ. आशीष खासबागे, प्रसिध्द साहित्यीक व समिक्षक सुरेश साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतंना प्राचार्य किसन पाटील म्हणाले की, जगाच्या पातळीवर मानवतावादी साहित्य वाड़:मय व आंबेडकरी वाड़:मयाचा उल्लेख होतो. विशेषत: आंबेडकरी साहित्य हे आत्मशोधाच्या अंगाने जाणारे असल्याने त्याची व्यापकता व परीणामकारकता मोठी असल्याचे सिध्द होत असल्याचे सांगितले. यावेळी प्रा. डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे, डॉ. आशीष खासबागे यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविक भाषणात साहित्यीक सुरेश साबळे यांनी साहित्याच्या क्षेत्रात डॉ. गंगाधर पानतावणे यांनी केलेल्या संस्थात्मक कार्याची ओळख व्हावी व मोबाईलच्या युगात चिंतनमननाची प्रक्रिया हरवून बसलेल्या विद्यार्थ्यांना विचाराने माणूस माणसाशी जोडणाºया साहित्याची गोडी निर्माण व्हावी, या हेतूने व्याख्यानाचे आयोजन असल्याचे सांगितले. संचालन शशिकांत इंगळे यांनी केले तर रमेश आराख यांनी आभार मानले. पाहुण्यांचा परिचय अमोल पैठणे यांनी दिला. कार्यक्रमाला साहित्यीक नरेंद्र लांजेवार, नारायण जाधव येळगावकर, प्रा. रवींद्र साळवे, शाहिर डी. आर. इंगळे, रवींद्र इंगळे चावरेकर, प्रा. आर. आर. वानखेडे, मांगिलाल राठोड, सुदाम खरे, सुरेश सरकटे, प्रा. कंकाळ, भगवान जाधव, एन. आर. वानखेडे, बी. के . इंगळे, कुणाल पैठणकर, डॉ. हर्षनंद खोब्रागडे, प्रा.संजय पोहरे, प्रा. देशमुख व प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर व विद्यार्थ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
माणूसपण, आत्मभान जागृत करणारे साहित्य पानतावणे यांनी निर्माण केले - डॉ. किसन पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2018 6:01 PM