चिखली : शहरातील विविध विकासकामांसाठी अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेंतर्गतचा निधी आ.श्वेता महाले, नगराध्यक्ष आणि चिखली नगरपालिकेतील सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रयत्नाने मिळाले असल्याचे स्पष्ट करून, या विकास कामांना आपल्या प्रयत्नाने मान्यता मिळाल्याचे प्रसिद्धिपत्रक काढून माजी आमदारांनी श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. त्यांचा हा प्रयत्न आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा प्रकार असल्याची टीका भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली आहे. अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेंतर्गत २ कोटी ७५ लक्ष रुपयांचा निधी शहरातील विविध विकासकामांसाठी मंजूर झाले आहेत. याबाबत माजी आ.राहुल बोंद्रे यांच्या कार्यालयाने एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे हा निधी बोंद्रेंच्या प्रयत्नाने मिळाल्याचे जाहीर केले होते. बोंद्रेंचा हा दावा खोडून काढताना ते श्रेय लाटत असल्याची बोचरी टीका आता भाजप पदाधिकाऱ्यांनी केली. शहरासाठी मंजूर झालेला निधी हा आमदार श्वेता महाले, नगराध्यक्षा व भाजप नगरसेवकांच्या प्रयत्नाने मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. मुख्याधिकारी नगरपरिषद चिखली यांच्या वेगवेगळ्या ठरावानुसार चिखली शहरातील मागास नागरी वस्तीमध्ये विविध विकास कामांचे प्रस्ताव तयार करून व सर्व त्रुटींची पूर्तता करून, जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी सादर केले होते. याबाबत आ.श्वेता महाले यांनी २५ जानेवारी, २०२१ रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठकीत प्रस्तावांना मान्यता देण्याची आग्रही मागणी केली होती. याच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री ना.डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी तातडीने प्रस्तावास मान्यता देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. चिखली नगरपालिकेत सत्ता भाजपची. प्रस्ताव तयार करणारी व सादर करणारी यंत्रणा नगरपालिका, कामांच्या मान्यतेसाठी पाठपुरावा आमदार श्वेता महाले व भाजपाच्या नगरसेवक व नगराध्यक्ष यांनी केला असताना, माजी आमदार मान्यताप्राप्त कामांचे फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रकार करीत आहे. सवंग प्रसिद्धीसाठीचा हा केविलवाणा प्रकार आहे, अशी टीका न.प.उपाध्यक्षा वजीराबी शे.अनिस, भाजपा शहराध्यक्ष तथा न.प.गटनेते पंडितराव देशमुख, आरोग्य सभापती विजय नकवाल यांनी केली आहे.
विकास निधीचे श्रेय लाटण्याचा प्रकार, आयत्या पिठावर रेघोट्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 4:35 AM