कृषीपुरक व्यवसायासाठीही आता खेळत्या भांडवलावर पतपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:42 PM2019-04-29T12:42:08+5:302019-04-29T12:42:34+5:30
बुलडाणा: अलिकडील काळात पीकर्ज वाटपाचा घटलेला टक्का पाहता आता पीककर्जाअंतर्गतच कृषीपुरक व्यवसायासाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्यांना एक लाख ६० हजार रुपयापर्यंत पतपुरवठा केल्या जाणार आहे. द
- नीलेश जोशी
बुलडाणा: अलिकडील काळात पीकर्ज वाटपाचा घटलेला टक्का पाहता आता पीककर्जाअंतर्गतच कृषीपुरक व्यवसायासाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्यांना एक लाख ६० हजार रुपयापर्यंत पतपुरवठा केल्या जाणार आहे. दरम्यान, त्यानुषंगाने रिझर्व बँकेसह नाबार्डने अनुक्रमे सात आणि १३ फेब्रुवारी रोजी एका परिपक्षत्रकान्वये निर्देश जारी केले आहेत. दरम्यान, जिल्हास्तरीय तज्ज्ञ समितीने चार एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करून त्याबाबतचे कर्ज दर निश्चित केले आहेत. विशेष म्हणजे या शेतकर्यांना उपरोक्त मर्यादेपर्यंत तारण देण्याची अवश्यकता राहणार नसल्याचेही सुत्रांनी स्पष्ट केले आहे.
मात्र एक लाख ६० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचा पतपुरवठा शेतकर्यांना करताना त्यांच्याकडून तारण घेतले जाणार आहे. तीन लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत हा पतपुरवठा केला जाणार असल्याचे नाबार्डच्या सुत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले आहे. कृषी पुरक व्यवसायामध्ये प्रामुख्याने पशुपालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन आणि रेशीम उद्योगासाठी हा पतपुरवठा केला जाणार आहे.
आचार संहितेच्या कटाच्यात अडकलेला जिल्ह्याचा तीन हजार ८७५ कोटी रुपयांचा वार्षिक पतआराखडा २४ एप्रिल रोजी जाहीर झाला असून खरीपासाठी यात एक हजार ७७३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यातंर्गत तीन लाख ७१ हजार ७२ शेतकर्यांना यंदा पीककर्ज वाटपाचे उदिष्ट देण्यात आलेले आहे. मात्र २०१७-१८ आणि २०१८-१९ या दोन वर्षात पीककर्ज वाटपाचा टक्का हा अनुक्रमे २६.१३ आणि ३४.१५ टक्केच राहला आहे. त्यामुळे वार्षिक पतआराखड्यात कृषी क्षेत्राचा वाटा ९५ टक्के असणार्या बुलडाणा जिल्ह्यासाठी ही बाब धोकादायक ठरणारी आहे. त्यातच गेल्या १८ वर्षात जिल्ह्यात दोन हजार ७५५ शेतकर्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी पाहता जिल्हा अग्रणी बँकेने हा मुद्दाही अधिक गांभिर्याने घेतला आहे. त्यामुळे शेती पुरक व्यवसायासाठी स्वतंत्रपणे पतपुरवठ्याचे लक्षांक निश्चित करण्यात आले नसले तरी पीककर्जाअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्यांना पतपुरवठा करण्याबाबच्या सुचना निर्गमीत करण्यात आलेल्या आहेत.
दीड लाखांपेक्षा अधिक रकमेसाठी लागणार तारण
हा पतपुरवठा करताना एक लाख ६० हजार रुपयापर्यंत अल्प व अत्यल्प भूधारकांना तारण देण्याची गरज राहणार नाही. किसान क्रेडीट कार्डअंतर्गत त्यांना गरजेनुसार पतपुरवठा मिळू शकणार आहे. मात्र त्यापेक्षा अधिक व तीन लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंतचा पतपुरवठा घेताना तारण द्यावे लागणार आहे. जिल्ह्यात दोन लाख ८५ हजारांच्या आसपास किसान क्रेडीट कार्डधारक शेतकरी आहे. त्यांच्यासाठी ही जमेची बाजू आहे. त्यांच्या वर्किंग कॅपीटल अर्थात खेळत्या भांडवलाच्या आधारावर किंवा त्यांच्याकडे असलेल्या गुरे तथा तत्सम पशुंच्या एककाच्या आधारावर हा पतपुरवठा केला जाऊ शकतो, असे नाबार्ड तथा जिल्हा अग्रणी बँकेच्या सु६ांनी सांगितले. शेती नसलेले परंतू शेती पुरक व्यवसाय करणारे स्वतंत्रपणे यासाठी कर्जाची मागणीही करू शकतात. याबाबत जिल्ह्यातील बँकांनाही सुचना दिल्या गेल्या असल्याचे सुत्रांनी सांगितले.
अशा पद्धतीने होऊ शकतो पतपुरवठा
तपशील युनीट तज्ज्ञ समितीने शिफारस केलेले कर्जदर
दुग्ध व्यवसाय १ जनावर १४,००० रुपये
छोटे रवंथ करणारी गुरे १०+१ १२,१००
मत्स्यपालन प्रती हेक्टर ४५,०००
कुकुटपालन ------- ------
मांसाळ पक्षी १०० पक्षी १६,०००
अंडी देणारे पक्षी १०० पक्षी ३०,०००
रेशीम उद्योग प्रती हेक्टर ४५,०००