लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : करोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू आहे. या काळात एकत्र येण्यासोबतच धार्मिक स्थळेही बंद असून धार्मिक स्थळावरील सार्वजनिक कार्यक्रमांनाही बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही चिखलीत एका धार्मिक स्थळी कार्यक्रमासाठी जमलेल्या १२ जणांविरोधात चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.‘लॉकडाऊन’ अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता संचारबंदीचे आदेश लागू आहेत. त्यानुसार चिखली शहरातील सर्व धार्मिक स्थळी होणारे सामुहिक धार्मिक कार्यक्रमात पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यास प्रतिबंध आहे. त्यानुषंगाने चिखली पोलीसांनी शहरात महत्त्वाच्या ठिकाणी फिक्स पॉर्इंट, सेक्टर पेट्रोलींग, पायी पेट्रोलींग, मोबाईल ड्युटी करीता पोलिस अधिकारी व कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे. त्यानुषंगाने गस्ती दरम्यान, ठाणेदार गुलाबराव वाघ यांना ३ एप्रिल रोजी स्थानिक बारभाई भागात एका धार्मिक स्थळानजीक काही व्यक्तींनी गर्दी केल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांनीव त्यांच्या सहकाºयांनी संबंधीत घटनास्थळ लगोलग गाठले. सोबतच तेथे जमलेल्या जवळपास १२ जणांविरोधात संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिस हेड कॉन्स्टेबल विक्रम काकड यांच्या तक्रारीवरून विविध कलमान्वये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्त्वात पोलिस उपनिरीक्षक किरण खाडे, पोलिस कॉन्स्टेबल विक्रम काकड, पोलिस नायक राहूल मेहुणकर, पुरुषोत्तम आघाव हे तपास करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
चिखलीत धार्मिक कार्यक्रमासाठी जमलेल्या १२ जणांविरोधात गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 5:39 PM