पावसाच्या अंदाजावर पीक लागवडीचे नियोजन
By admin | Published: May 18, 2015 01:49 AM2015-05-18T01:49:29+5:302015-05-18T01:49:29+5:30
शेतकरी विचारात ; सोयाबीन, कपाशी या दोन्ही पिकांना प्राधान्य.
बुलडाणा : गत दोन वर्षांपासून सोयाबीन पिकावर गंडांतर येत आहे. २0१३ मध्ये अतवृष्टी तर २0१४ मध्ये विलंबाने आलेल्या पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन झाले नाही. यामुळे शेतकर्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले. यंदाही कपाशीचे क्षेत्र वाढणार असल्याचे नियोजन कृषी विभागाने सादर केले आहे. असे असले तरी शेतकरी मात्र पावसाचा अंदाज घेऊनच पीक लागवडीचे नियोजन करणार असल्याचे संकेत आहेत. २0१३ च्या खरीप हंगामात अतवृष्टीने सोयाबीन पीक शेतकर्यांच्या हातचे पूर्णत: गेले. यामुळे यंदा शेतकरी सोयाबीनच्या तुलनेत कपाशीचा पेरा वाढविणार असल्याचे दिसते. या दृष्टीने कृषी विभाग व खासगी कृषी केंद्र बियाण्यांचे नियोजन करीत आहे. दोन वर्षांपासून सोयाबीनमध्ये नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यंदाचा हंगाम मात्र अर्धा सोयाबीन व अर्धी कपाशी, अशीच लागवड राहणार असल्याचे चित्र आहे. सध्या बाजारात ३0 किलो वजनाच्या बियाण्यांचा भाव दोन हजार रुपये आहे. कंपन्यांचे बियाणे बाजारात येण्यास प्रारंभ झाला आहे. मागील अतवृष्टी व खराब हवामानाचा अनुभव पाहता यंदा पावसाच्या अंदाजावरच कपाशी की सोयाबीन, या पीक लागवडीला प्राधान्य राहणार आहे. अनेक खासगी कंपन्या सोयाबीन बियाणे उगवण शक्तीची हमी देत आहे; पण प्रत्यक्षात याचा फटका शेतकर्यांना बसतो. खासगी विक्रेत्यांकडून काळाबाजार होणार नाही, याची विशेष खबरदारी कृषी व पं.स. विभागाला घ्यावी लागणार आहे. तसेच हंगामापूर्वी कृषी विभागाने पावसानुरूप कोणते बियाणे उपयुक्त ठरेल, याचे मार्गदर्शन करणे गरजेचे झाले आहे. भरारी पथकाद्वारे बोगस बियाण्यांवर लगाम लावणेही गरजेचे आहे. खरीप हंगामातील सोयाबीन व कपाशी या मुख्य पिकांची शेतकरी पावसाच्या अंदाजानुसार कमी-अधिक प्रमाणात लागवड करणार आहेत.