लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : खुल्या बाजारपेठेत कापसाची दरवाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता सीसीआय केंद्राऐवजी खासगी व्यापाऱ्यांकडे कापसाची विक्री सुरू केली आहे. त्यामुळे सध्या तालुक्यातील सर्वच सीसीआय केंद्रे ओस पडल्याचे दिसून येत आहे.खामगाव तालुक्यात प्रतिवर्षी कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे या ठिकाणी कापसावर प्रक्रिया करणारे जिनिंग प्रेसिंग युनिट आहेत. गत पंधरा दिवस अगोदर खुल्या बाजारपेठेत कापसाला ४,५०० ते ५,००० हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव होता, तर सीसीआयचा भाव ५ हजार ७२५ रुपये होता. त्यामुळे सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी वाहनांची गर्दी होती. मात्र, गत आठ-दहा दिवसांत बाजारपेठेत कापसाचे भाव वधारले आहेत. सध्या व्यापारी जागेवरून ५,८०० ते ५,९०० रुपये भावाने कापस खरेदी करीत आहेत. जिनिंगवर चांगल्या प्रतीच्या कापसाला सहा हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या सीसीआय कापूस खरेदी केंद्रावरील गर्दी कमी झाली आहे. इतकेच नव्हे, तर नोंदणी करून सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर उभी असलेली वाहने शेतकऱ्यांनी शहरातील खासगी बाजारपेठेत नेली आहेत. वाहने नसल्याने सीसीआयची खरेदी केंद्रे ओस पडली आहेत.
सीसीआय कापूस खरेदी केंद्रातील गर्दी ओसरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2021 12:34 PM