अतिक्रमणाच्या शेतात गांजाची लागवड; पावणे दोन क्विंटल झाडे जप्त
By सदानंद सिरसाट | Published: December 23, 2023 04:30 PM2023-12-23T16:30:47+5:302023-12-23T16:31:18+5:30
हिंगणाकाझी शिवारात मुद्देमालासह शेतकरी गजाआड
मलकापूर, (बुलढाणा) : तालुक्यातील हिंगणाकाझी शिवारातील पावणे दोन क्विंटल व सुमारे १८ लाख ५७ हजार रुपये किमतीचे गांजाचे पीक मलकापूर ग्रामीण पोलिसांनी जप्त केले. शुक्रवारी रात्री केलेल्या कारवाईत पोलिसांनी शेतकऱ्यास गजाआड केले. या घटनेमुळे पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.
माहितीवरून मलकापूर ग्रामीण पोलिसांनी तालुक्यातील हिंगणाकाझी शिवारात शुक्रवारी रात्री ९ वाजता धाड घातली. त्यात गट क्रमांक ५२ मधील सुभाष भागवत पाखरे त्याने अतिक्रमण केलेल्या शेतात गहू, कपाशी व तूर या पिकांसोबत स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररीत्या गांजाची ७३ झाडे लावल्याची माहिती समोर आली. त्या झाडांचे वजन १ क्विंटल ८५ किलो ७७ ग्रॅम इतके आहे. तर त्या पिकाची एकूण किंमत सुमारे १८ लाख ५७ हजार ७०० रुपये आहे. शेतकरी बेकायदेशीरपणे गांजाची झाडे लावून संवर्धन व जोपासना करीत असल्याचे पोलिस कारवाईत आढळून आले. या घटनेत ग्रामीण पोलिसांनी सुभाष भागवत पाखरे (वय ३३, रा. भालेगाव, ता. मलकापूर) यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम २० एनपीडीएस कायद्यान्वये शनिवारी पहाटे ३ वाजता गुन्हा दाखल केला. शेतकऱ्यास मुद्देमालासह गजाआड करण्यात आले. ग्रामीण पोलिस निरीक्षक संदीप काळे, उपनिरीक्षक प्रशांत राठोड, पोहेका सचिन दासार, रघुनाथ जाधव, रविकांत बावस्कर, गणेश सूर्यवंशी, नीता मोरे, संदीप राखोंडे, सुभाष सरकटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.