लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : एकाच कुटुंबातील तिघा भावांपैकी एकाचा सकाळी तर दुसर्याचा संध्याकाळी मृत्यू झाला. तर तिसरा मृत्यूशी झुंज देत आहे. त्यामुळे त्यांच्या आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळल्याची घटना मलकापूर येथील सालीपुर्यात शुक्रवार, १७ रोजी घडली. वयाची पन्नाशीदेखील गाठली नसताना तीन पैकी दोघांना सरणावर जाताना व तिसर्याला मृत्युशी झुंज देताना बघण्याचा दुर्दैवी प्रसंग सालीपुर्यातील भिकाजी गणपत पाटील (वय ४६) यांच्यावर ओढवला आहे. मलकापूर येथील सालीपुरा भागातील रहिवाशी भिकाजी पाटील यांना राहुल (वय १८), अक्षय (वय १५) आणि गणेश (वय १३) अशी तीन मुले होती. मोलमजुरी करुन कुटुंबांचा उदरनिर्वाह करणार्या पाटील यांच्या तीनही मुलांना दिव्यांगत्व हे जन्मत:च हो ते. तरी देखील वयाच्या सातव्या वर्षापर्यंत ही तिन्ही भावंडे शाळेत शिकायला गेली. चांगल्या पद्धतीने शिकलीही, असे शेजारी सांग तात.मात्र सातव्या वर्षानंतर मोठा मुलगा राहुलने पाय टाकले. त्याला चालता येईना. तेव्हा हलाखीची परिस्थिती असताना भिका पाटील यांनी त्याला मुंबईपर्यंत नेवून त्याच्यावर उपचार केले; पण उपयोग झाला नाही. दुसरा मुलगा अक्षय व लहान मुलगा गणेश यांच्यावरही तशीच पाळी आली. दरम्यान लहान मुलगा गणेश याची प्रकृती बिघडल्याने त्याला १६ ऑगस्ट रोजी अकोला येथे भरती करण्यात आले.शुक्रवारी अकोल्यातच गणेशची प्राणज्योत मालविली. त्याच्यावर १७ ऑगस्टला दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच दिवशी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास भिका पाटील यांचा मोठा मुलगा राहुल याचीही प्राणज्योत मालविली. त्याच्यावर रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. अशा पद्धतीने एकाच दिवशी दोघा भावांचा मृत्यू झाल्याने येथील सालीपुर्यात शोककळा पसरली, तिसरा मुलगा अक्षयदेखील गंभीर आजारी आहे. भिकाजी पाटील यांची परिस्थिती जेमतेम असल्याने प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष नीलेश ठोकळ यांच्या नेतृत्वात सोपान पाटील, गोविंद गिरी, संतोष पाटील, श्याम राऊत आदींनी पाटील कुटुंबीयांना मदत केली.