बुलडाणा : काेराेना संसर्ग राेखण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे़ त्यामुळे, जिल्हाभरात विविध केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे़ ग्रामीण भागात गत काही दिवसांपासून लस घेतलेले दाेन वर्षांत मृत्युमुखी पडतील, नपुंसकत्व येते, इतर आजार जडतात, अशा अफवा पसरल्या आहेत़ त्यामुळे, लसीकरणावर याचा परिणाम झाला आहे़
काेराेनाच्या दुसऱ्या लाटेचा जिल्ह्याला माेठ्या प्रमाणात फटका बसला़ अनेक रुग्णांचा मृत्यू झाला़ पहिल्या लाटेच्या वेळी शहरापर्यंत मर्यादित असलेला काेराेना दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात पाेहोचला आहे़ त्यामुळे, आराेग्य व्यवस्थेवर माेठा ताण वाढला आहे़ काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने लसीकरण सुरू केले आहे़ जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात लसीकरण सुरू झालेले आहे़ सध्या लस उपलब्ध नसल्याने १८ ते ४४ वयाेगटाचे लसीकरण थांबवण्यात आले आहे़ दुसरीकडे ४४ पेक्षा जास्त लाेकांना लस मिळत असली तरी ग्रामीण भागात अफवा पसरवण्यात येत असल्याने अनेक जण लस घेण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे़ समाजमाध्यमावर अशा अफवा पसरत असल्याने ग्रामस्थांमध्ये गैरसमज निर्माण झाल्याने लसीकरणावर परिणाम हाेत आहे़
लसीकरणाविषयी या आहेत अफवा
दाेन वर्षांनंतर मृत्यू हाेणार
काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमावर एका नाेबेल पारिताेषिक विजेत्या शास्त्रज्ञाचा हवाला देत लस घेतलेल्या लाेकांचा दाेन वर्षांनंतर मृत्यू हाेणार असल्याआ संदेश फिरत हाेता़ अनेकांना हा संदेश मिळाल्याने ताे ग्रामीण भागातही वाऱ्यासारखा व्हायरल झाला़ त्यामुळे, लाेकांमध्ये लस घेतल्याने मृत्यू हाेताे, अशी अफवा पसरली आहे़
नपुंसकत्व येते
लस घेल्यानंतर काही वर्षांनी नपुंसकत्व येते अशी अफवा ग्रामीण भागात पसरली आहे़ त्यामुळे, १८ ते ४४ वयाेगटासाठी लसीकरण सुरू झाल्यानंतर काही गावांमध्ये युवकांचा प्रतिसाद नव्हता़ अनेक जण या भीतीमुळे लस घेण्यासाठी पुढाकार घेत नसल्याचे चित्र आहे़ मात्र, लसीमुळे असा कुठलाही प्रकार हाेत नसल्याचे आराेग्य विभागाने स्पष्ट केले आहे़
इतर आजार हाेतात
काेराेनाची लस घेतल्यानंतर इतर आजार हाेतात, अशीही अफवा ग्रामीण भागात आहे़ राेग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी लस देण्यात येत आहे़ दरराेजच्या जेवणात सकस आहार घेतल्यानंतर तशीही राेगप्रतिकार शक्ती वाढते़ त्यामुळे, वेगळी लस घेण्याची गरज नसल्याचा समज ग्रामस्थांचा झाला आहे़ त्यामुळे, लसीकरण केंद्राकडे अनेक ग्रामस्थ पाठ फिरवित असल्याचे चित्र आहे़
ग्रामस्थ संभ्रमात
लसीकरणाविषयी ग्रामीण भागात अनेक अफवा पसरविल्या जात आहेत़ त्यामुळे, ग्रामस्थ लस घेत नसल्याचे चित्र आहे़ त्यामुळे, आराेग्य विभागाने लसीकरणाविषयी जनजागृती करण्याची गरज आहे़
- डाॅ़ हेमराज लाहाेटी, माजी उपसभापती
काेराेना लसीकरण सध्या ग्रामीण भागातही सुरू आहे़ अनेक ग्रामस्थांमध्ये याविषयी गैरसमज निर्माण झाले आहेत. लस कशी सुरक्षित आहे, याविषयी आराेग्य विभागाने ग्रामीण भागातील लाेकांना मार्गदर्शन करावे़
- दिलीप वाघ, शिवसेना नेते
समाजमाध्यमावर फिरणारा संदेश चुकीचा
लस घेल्यानंतर दाेन वर्षांनी मृत्यू हाेणार असल्याचा समाजमाध्यमावर फिरणारा संदेश चुकीचा आहे़ काेराेना लस सुरक्षित आहे़ काेराेना संसर्ग राेखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे़ त्यामुळे, ग्रामस्थांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये़
- डाॅ़ बाळकृष्ण कांबळे, जिल्हा आराेग्य अधिकारी, बुलडाणा