कोरड्या विहिरीत दोन दिवसापासून काळवीटाची मृत्यूशी झुंज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 12:51 PM2019-01-09T12:51:19+5:302019-01-09T12:54:08+5:30
संग्रामपुर : गेल्या दोन दिवसापासून एका शिवारातील कोरड्या विहिरीत एका काळवीटाची मृत्यूशी झुंज सुरू आहे.
- अजहर अली
लोकमत न्युज नेटवर्क
संग्रामपुर : गेल्या दोन दिवसापासून एका शिवारातील कोरड्या विहिरीत एका काळवीटाची मृत्यूशी झुंज सुरू आहे. संग्रामपूर तालुक्यातील वडगाव वान शिवारात वडगाव वान दानापूर रस्त्यालगत एका शेतामधील कोरड्या विहिरीत काळवीट पडून असल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले.
दोन दिवसापासून हे काळवीट विहिरीत पडले असल्याचे नागरिकांनी सांगितले. पाण्याच्या शोधात वन्यजीव वणवण भटकंती करीत असल्याचा मुद्दा या निमित्त्याने ऐरणीवर आला आहे. काळवीट पाण्याच्या शोधात भटकत असताना कोरड्या विहिरीत जाऊन पडले असावे असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. शेतशिवारांमध्ये वन्यजिवांची भटकंती चिंतेचा विषय असल्याने यावर वनविभागाने तात्ळीने पाऊले उचलण्याची गरज आहे. या घटनेची माहिती जळगाव जामोद येथील प्रादेशिक वनपरिक्षेत्र कार्यालय यांना देण्यात आली असून दुपारपर्यंत वन विभागाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी पोहोचला नाही. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी काळविटाला काढण्याचा प्रयत्न केला. मात्र काळविट बाहेर काढण्यात अडथळा येत असल्याचे त्यांनी सांगितले. वनविभागाच्या रेस्क्यु टिमने लवकरात लवकर काळविटाला बाहेर काढण्याची गरज आहे. घटनास्थळावर वन विभागाचा एकही कर्मचारी फिरकला नसल्याने नागरिकांमध्ये रोष आहे. सध्या तरी पडून असलेला काळवीट कोरड्या विहिरी मध्ये मृत्यूशी झुंज देताना दिसत आहे.