अमडापूर ग्रामपंचायतच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 01:13 PM2017-11-07T13:13:11+5:302017-11-07T13:15:04+5:30
गावातील गावातील विकास कामांना वेग दिल्या जावा व प्रकरणाची चौकशी व्हावी, या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य अर्जुन नेमाडे यांनी ६ नोव्हेंबर रोजी बुडाणा जिल्हाधिकारी यांच्याकडे लोकशाही दिनात निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे.
अमडापूर : चिखली तालुक्यातील अमडापूर ग्रा.पं.ला शासन स्तरावरून गावातील विकास कामासाठी १४ व्या वित्त आयोगामार्फत लाखो रूपयांचा निधी देण्यात आला आहे. परंतु, गावातील विकासकामारीता या निधीच्या विनियोगात ग्रामपंचायत सरपंच आणि सचिवाने गलथान कारभार केल्याने गावातील विकासकामे थंडबस्त्यात पडली आहे. प्रकरणी गावातील गावातील विकास कामांना वेग दिल्या जावा व प्रकरणाची चौकशी व्हावी, या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य अर्जुन नेमाडे यांनी ६ नोव्हेंबर रोजी बुडाणा जिल्हाधिकारी यांच्याकडे लोकशाही दिनात निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे.
निवेदनामध्ये म्हटले आहे की, ग्रामपंचायत ही विकासाचा केंद्रबिंदू आहे. गावाच्या विकासाचे नियोजन गावातच करण्यासाठी ग्रामसभेला शासनाने विशेष अधिकार दिलेले असताना ग्रामसभेत व मासीक सभेत विकासाचे अनेक ठराव घेवून सुध्दा पदाधिकारी व अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे विकासाचे तिनतेरा वाजले आहेत. आमचा गाव आमचा विकास उपक्रमाअंतर्गत अमडापूर ग्रामपंचायतीमध्ये विकास कामासाठी १४ व्या वित्त आयोगातून गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात मिळणारा निधी योग्य नियोजन करण्यासाठी ५ वर्षाचा कृती आराखडा तयार करताना गावातील प्रत्येक वार्डातील समस्या लक्षात घेवून तो तयार करीत मंजूर करून घेतला आहे. त्यावर केंद्र शासनाच्या ध्येय धोरणानुसार ग्रामविकास निधी सरपंच व सचिव यांच्या खात्यात १४ व्या वित्त आयोगातून आलेले १ कोटी ४ लाख ९९ हजार २२९ रूपये जमा आहेत. गावातील स्मशानभूमीचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. गावात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. वार्ड नं.५ मध्ये मेन रोडचे काम झालेले नाही, नाल्यासफाई नाही, क्रीडा मैदान नाही, अनेक भागामध्ये जाणेयेणेसाठी रस्ते नाही. अशा समस्या उद्भवलेल्या असतानासुध्दा १४ व्या वित्त आयोगाचा खात्यामध्ये कोट्यावधी रूपये जमा आहेत. सरपंच व सचिव यांनी कोणतेची कामे केली नसल्याने गावाचा विकास खुटंला असल्याचे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. प्रकरणी त्यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करून कारवाई केली जावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे ग्रामपंचायत सदस्य अर्जुन नेमाडे यांनी लोकशाहीदिनी आपल्या सहीनिशी दिली आहे.