ग्रामीण भागातील बस फेऱ्या सुरू करा
सिंदखेड राजा : काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याने अनलाॅक प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, तरीही ग्रामीण भागातील बस फेऱ्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत. ग्रामस्थांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे. याकडे आगार प्रमुखांनी लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.
पिंपळांच्या झाडांचे संवर्धन काळाची गरज
किनगावराजा : उत्तम आराेग्यासाठी पिंपळाच्या झाडांचे संवर्धन महत्त्वाचे आहे. कायम प्राणवायू देणारा हा वृक्ष आहे. वृक्षाराेपण करून त्यांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे, असे मत शिवाजीराव राजे जाधव यांनी व्यक्त केले.
जप्त केलेला वाळूसाठा लंपास
माेताळा : तालुक्यातील रामगाव येथे महसूल विभागाने जप्त केलेला वाळू साठा अज्ञात चाेरट्यांनी लंपास केला आहे. या प्रकरणाची चाैकशी करून कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र लढा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष लुकमान शहा यांनी केली आहे.
साहित्य चाेरणाऱ्यास अटक करण्याची मागणी
चांडाेळ : येथील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी पूर्व माध्यमिक शाळेच्या वर्ग खोलीतील फॅन व स्ट्रीट लाईट अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना १६ जून रोजी रोजी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाेरट्यांना अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
बियाण्यातून घेतले आठ लाखांचे उत्पन्न
बुलडाणा : चिखली तालुक्यातील किन्होळा, मंगरूळ नवघरे व अंबाशीच्या शेतकऱ्यांनी घरीच ठेवलेले घरचे बियाणे विकले. या विक्रीतून खरीप हंगामातच त्यांनी आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले.
राजेगाव येथे चाेरट्यांचा हैदाेस
साखरखेर्डा : पाेलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या राजेगाव येथे अज्ञात चाेरट्यांनी तीन हजार रुपये राेख व इतर साहित्य लंपास केले. याप्रकरणी साखरखेर्डा पाेलिसांनी अज्ञात चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दुचाकी लंपास, चाेरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल
बुलडाणा : संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा बु. येथील आकाश जगन्नाथ पालीवाल यांची दुचाकी क्र. एमएच २८ एपी ४५०९ अज्ञात चाेरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी तामगाव पाेलिसांनी अज्ञात चाेरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फीसाठी पालकांची अडवणूक करू नये
बुलडाणा : थकीत फीसाठी खासगी शाळांनी पालकांना वेठीस धरू नये, असे आदेश शिक्षण विभागाने काढले आहेत. फी भरली नाही म्हणून काेणत्याही विद्यार्थ्यांचा निकाल, कागदपत्र राेखू नयेत, तसेच ऑनलाईन क्लास बंद करू नयेत, असेही आदेशात म्हटले आहे.
शेंदुर्जन, साखरखेर्डा मंडळात जाेरदार पाऊस
साखरखेर्डा : शेंदुर्जन, साखरखेर्डा मंडलात जोरदार पाऊस झाला. सिंदखेडराजा व मलकापूर पांग्रा मंडलातही तुलनेने कमी पाऊस झाला, तर किनगावराजा, दुसरबीड व सोनोशी मंडळात वादळी वारे असले तरी पाऊस पडला नाही.
जोरदार पावसामुळे सवडद येथील रपटा वाहून गेला
सिंदखेडराजा : जोरदार पावसामुळे तालुक्यातील सवडद ते गजरखेड मार्गावरच्या नाल्यावर असलेला रपटा वाहून गेला आहे. त्यामुळे पेरणीची कामे खोळंबण्याची शक्यता आहे. सरपंच शिवाजी लहाने, तेजराव बाप्पू देशमुख, विनोद देशमुख आदींनी त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.
शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये
बुलडाणा : पावसाचा लहरीपणा आणि ऐन पेरणीच्या हंगामात पावसाचा पडलेला खंड लक्षात घेता शेतकरी बंधूंनी पेरणीची घाई करू नये, पुरेसा पाऊस पडल्यावर व जमिनीत उपयुक्त ओल यांची खात्री करूनच पेरणी करावी, असे प्रतिपादन कृषी हवामान तज्ज्ञ, मनेश यदुलवार यांनी केले.