- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: जिल्ह्यातील संभाव्य चाराटंचाईची शक्यता पाहता जुलै २०१९ अखेर पर्यंत जिल्ह्यातून परजिल्ह्यात चारा वाहतूक करण्यास बंदी घातलेली असतानाही सिमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणावर चाऱ्याची परजिल्ह्यात वाहतूक होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला न जुमानता वाशीम व अकोला जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातही प्रामुख्याने हा चारा पळविला जात आहे. जिल्ह्यातील पर्जन्यमान कमी राहिल्याने यंदा खरीप हंगामात शेतकºयांना फटका बसला. अत्यल्प पावसामुळे जलस्त्रोत तहानलेले असून, धुरे, बंधारे या ठिकाणी चाऱ्याची कमतरता दिसून येत आहे. त्यामुळे जनावरांच्या चारा व पाण्याचाही प्रश्न आहे. परिणामस्वरूप जिल्ह्यावर यंदा दुष्काळाचे ढग निर्माण झाले आहेत. संपूर्ण जिल्हाच दुष्काळाच्या कचाट्यात सापडलेला आहे. सध्या जिल्ह्यात चारा टंचाई नाही; मात्र यावर्षी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने भविष्यात जनावरांना चाराटंचाईस सामोरे जावे लागू नये, म्हणून बुलडाणा जिल्ह्यातून परजिल्ह्यात किंवा परराज्यात चारा वाहतूक केल्यास संबंधीतांवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी दिले आहेत. जुलै २०१९ पर्यंत या आदेशाची अंमलबजावणी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी परजिल्ह्यात चारा नेण्यास मनाई केली असतानाही या आदेशाला न जुमानता बुलडाणा जिल्ह्यातून परजिल्ह्यात चाºयाची वाहतूक केली जात असल्याचे दिसून येते.
डोणगाव भागातून जातो सर्वाधिक चारा
जिल्ह्याच्या सिमावर्ती भागातून सर्वाधिक चारा वाहतूक सध्या होत आहे. त्यात मेहकर तालुक्यात डोणगाव या भागातून परजिल्ह्यात चारा वाहतूक होत असल्याचे दिसून येते. त्यामध्ये डोणगाव ते गोहोगाव दांदडे या शिवारातून अनेक मोठ-मोठी वाहने चारा वाहतूक करताना दिसून येतात. शेतातून छोट्या वाहनातून कुटाराची वाहतूक मुख्य रस्त्यावर केली जाते. त्यानंतर ते कुटार मोठ्या वाहनात भरून त्याची अकोला, वाशीम व पुणे या ठिकाणी वाहतूक केल्या जात असल्याची माहिती आहे.