खामगाव: येथील श्री संत पाचलेगावकर महाराजांच्या श्री मुक्तेश्वर आश्रमात सोमवार २ जानेवारीपासून सुरू असलेल्या निगुर्ण पादुका महोत्सवानिमित्त सोमवारी सदगुरू संचारेश्वर माउली आणि मुक्तेश्वर माउलींची नगर प्रदक्षिणा काढण्यात आली. या महोत्सवानिमित्त खामगाव येथील मुक्तेश्वर आश्रमात मुंबईसह राज्याच्या कानाकोपर्यातील भाविकांची मांदियाळी दिसून येत आहे.
सोमवारी सायंकाळी ५: ३० वाजता नॅशनल हायस्कूल समोरील मुक्तेश्वर आश्रमातून नगर परिक्रमेला सुरूवात झाली. मुक्तेश्वर आश्रम, नॅशनल हायस्कूल, बालाजी प्लॉट, अग्रसेन चौक, महावीर चौक, जगदंबा चौक, पॐरशी मार्गे या मिरवणुकीचा मुक्तेश्वर आश्रमात समारोप करण्यात आला. या मिरवणुकीत संचारेश्वर माउलींचा रजत मुखवटा, मुक्तेश्वर माउलींची आकर्षक मूर्ती असलेल्या रथासमोर धर्मदंड आणि धर्मध्वजा घेतलेले भाविक आणि घाटपुरी तसेच लासुरा येथील वारकरी मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी दिंडीचे स्वागत झाले.
यावेळी मिरवणुकीत सहभागी वारकर्यांनी श्रीराम महाराज खेडकर, रमेश महाराज मनार्डी, संतोष महाराज भोनगाव, योगेश महाराज वरखेड, श्रीराम महाराज लासूरा, एकनाथ महाराज शेलोडी, शिवराम महाराज वक्टे यांच्या मार्गदर्शनात ठिकठिकाणी पावली सादर केली. भगवंतांचे नामस्मरण करीत महिला भाविकांनी फुगडीचा फेर धरला. सुरूवातीला लक्ष्मण धोंडगे, आदेश तामसे, मोहन नाईक, किशोर नांदोस्कर, राज मांजरेकर आदींनी श्रींच्या पालखीचे स्वागत केले.मिरवणूक यशस्वी करण्यासाठी श्री मुक्तेश्वर आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष माधव जोशी, गणेश आमले, गोपालसिंह चव्हाण, अरविंद ताम्हण यांच्यासह खामगाव व मुंबई येथील भाविकांनी परिश्रम घेतले. सामुहिक उपासना, आरतीनंतर मिरवणुकीची सांगता झाली.