- ओमप्रकाश देवकर मेहकर : तालुक्यातील देऊळगाव माळी जिल्हा परिषद केंद्रिय मराठी प्राथमिक शाळेने डिजिटल प्रणालीचा अध्यापनासाठी वापर केल्याने विद्यार्थ्यांचे अध्ययन अधिक सोपे झाले आहे. त्यामुळे शाळेमध्ये गुणवत्ता टिकविणे सोपे झाले असून डिजिटल प्रणालीच्या अध्यापणामुळे व इतर विद्यार्थी उपयोगी शैक्षणिक सुविधांमुळे या शाळेला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. येथील जिल्हा परिषद केंद्रिय मराठी प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी अध्यापनाचे कार्य पार पाडत असताना विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची रूजवनही केली असल्याने गावातील पालक समाधानी आहेत. शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य निर्मिती व वापर, ज्ञानरचनावादी अक्षर कोपरे, क्षेत्रभेट, उत्तम ग्रंथालय, ई-लर्निंग, खेळण्याचे साहित्य, स्वच्छ प्रसाधनगृह, हँडवॉश, पिण्याचे पाणी, वर्गात बसण्यासाठी सुलभ व्यवस्था आदी गोष्टी शाळेत गेल्यानंतर निदर्शनास येतात. शाळेच्या आवारातील सर्व भिंती बोलक्या झाल्या आहेत. भिंतीवर अंकगणित, भूगोल, मराठी, इंग्रजी मुळाक्षरे आधी रेखाटले असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्या नेहमी-नेहमी नजरेसमोर पडून अध्ययनात त्याची मदत होत आहे. शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार केले जात असून त्यांच्या शालेय पोषण आहाराकडे, मध्यान्न भोजनाकडे शिक्षक स्वत: लक्ष देत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती व शाळेची पटसंख्या लक्ष वेधून घेत आहे. या शाळेवर मुख्याध्यापक विजया जगधने, सहायक अध्यापक दिलीप मगर, गजानन मगर, विश्वनाथ मगर, सखाराम बळी, संतोष सावळकर, अरुण बळी, संतोष चोपडे, सुनील मगर, उषा केंधळे या शिक्षकांसह शालेय व्यवस्थापन समितीचे विशेष शाळेकडे लक्ष असते. यासर्वांची फलश्रृती म्हणून शाळेला आयएसओचे मानांकन मिळाले आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, याकरीता पाठांतर केल्यापेक्षा कृतीतून शिकवण्यावर आम्ही सर्वजण भर देत आहोत. विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी डिजिटल वर्गखोल्या सह प्रशस्त ग्रंथालयाची निर्मितीसुद्धा शाळेमध्ये करण्यात आली आहे. यामध्ये अध्यापन साहित्यासह इतर बाल गोष्टींची पुस्तके भरण्यात आली आहेत. - विजया जगधने, मुख्याध्यापक, देउळगाव माळी.
डिजिटल पद्धतीने अध्ययन झाले सुकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 6:10 PM