बुलडाणा : नगर पालिकेच्या वतीने काेराेनाविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी विविध पथकांची स्थापना केली आहे. या पथकांनी काही दुकानदारांकडून १०० रुपये प्रति दुकानदार प्रमाणे वसुली केल्याची चर्चा रविवारी बुलडाणा शहरात रंगली. याविषयी एक व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे.
बुलडाणा शहरात गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे. काेराेना संसर्ग वाढत असला तरी नागरिकांकडून मात्र नियमांचे पालन हाेत नसल्याने चित्र आहे. नागरिकांना शिस्त लावण्यासाठी बुलडाणा नगर पालिकेने काही पथकांची स्थापना केली आहे. यातील एका पथकाने दुकानदारांकडून पावती न फाडता १०० रुपयांप्रमाणे वसुली केल्याची चर्चा रविवारी शहरात हाेती. तसेच याविषयीची एक व्हिडिओ क्लिप समाजमाध्यमावर व्हायरल झाली आहे. या प्रकाराविषयी नगर पालिकेचे मुख्याधिकारी महेश वाघमाेडे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ताे हाेऊ शकला नाही.