संभाजीराजे यांची पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासोबत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:22 AM2021-07-05T04:22:04+5:302021-07-05T04:22:04+5:30
मराठा समाजासह इतर बहुजन समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी खा. संभाजीराजे भोसले ‘अॅक्शन मोड’वर आहेत. या अनुषंगाने त्यांनी जनसंपर्क दौरा ...
मराठा समाजासह इतर बहुजन समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी खा. संभाजीराजे भोसले ‘अॅक्शन मोड’वर आहेत. या अनुषंगाने त्यांनी जनसंपर्क दौरा काढला आहे. ४ जुलै रोजी ते विदर्भात दाखल झाले असून, देऊळगावराजा येथील सहविचार सभेनंतर चिखलीवरून जात असताना त्यांनी मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांची सदिच्छा भेट घेतली आहे. जनसंपर्क दौऱ्यापूर्वी खा.संभाजीराजेंनी आरक्षणाच्या या लढ्यात पुरुषोत्तम खेडेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहयोग लाभत असल्याचे एका पोस्टव्दारे स्पष्ट केले होते. दरम्यान, आज चिखली येथे त्यांची प्रत्यक्ष भेट घेतल्यानंतर शिवश्री खेडेकर व संभाजीराजेंमध्ये सुमारे अर्धातास बंदव्दार चर्चा पार पडली. या चर्चेत नेमके काय घडले याबाबत मात्र, कळू शकले नसले तरी प्रामुख्याने बहुजन समाजाच्या हितासाठी गरजेचे असलेले आरक्षण व आगामी काळातील रणनीतीबाबत विचारविनिमय झाला असवा, असे बोलल्या जात आहे. दरम्यान, ही कौटुंबिक भेट असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून यानिमित्ताने खा. संभाजीराजेंनी पुरुषोत्तम खेडेकर व माजी आमदार रेखाताई खेडेकर यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.
संभाजीराजेंचे स्वागत
खेडेकर परिवाराच्यावतीने यानिमित्ताने खा. संभाजीराजेंचे यथोचित आदारातिथ्य करून आपल्या निवासस्थानी स्वागत केले. यानिमित्ताने खा. संभाजीराजेंना शिवप्रतिमा व माजी आमदार रेखाताई खेडेकर यांच्या एकसष्टीनिमित्त प्रकाशित 'जनरेखा' हा गौरवग्रंथ भेट स्वरूपात देण्यात आला. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे सौरभ खेडेकर, प्रीती खेडेकर, तुषार धाडवे पाटील, स्रेहल धाडवे पाटील व कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.