बुलडाणा जिल्ह्यात अतीपावसाने जमिनी खरडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 01:30 PM2019-06-30T13:30:59+5:302019-06-30T13:31:02+5:30
अतीपावसामुळे पैनगंगा नदीकाठावरील शेतजमीनी खरडून गेल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली असून पर्जन्यमानाच्या टक्केवारीत बुलडाणा, शेगावने शंभरी पार केली आहे. आतापर्यंत अनेक नद्यांना पूर गेला आहे. अतीपावसामुळे पैनगंगा नदीकाठावरील शेतजमीनी खरडून गेल्या आहेत.
संततधार सुरू असलेल्या पावसाने पैनगंगा नदीला पूर आला आहे. तर अनेकठिकाणच्या शेतजमीनी खरडून गेल्या आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला हुलकावणी दिलेल्या वरुणराजाने आठवड्यापासून दमदार हजेरी लावली आहे. पावसाच्या तडाख्याने जमिनी खरडल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. पाच दिवसांत पैनगंगा नदीला चौथ्यांदा पूर आल्यामुळे शेतजमिनींचे प्रचंड नुकसान झाले. नुकसानाचे पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश तलाठी व संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. बुलडाणा तालुक्यात २६ जूनच्या रात्री मुसळधार पावसाची नोंद झाली. साखळी बु.मंडळात ८३ मिमी, धाड ८१ मिमी , देऊळघाट ७३ तर म्हसला बु. मंडळात ७१ मिमी पावसाची नोंद झाली. यामुळे पैनगंगेला दुसऱ्यांदा पूर गेला. ही अतिवृष्टी व पुराचे पाणी काठावरील शेतात घुसल्याने शेतजमिनीचे प्रचंड नुकसान झाले. यामध्ये अंभोडा, उमाळी, हतेडी खुर्द, कोलवड, सागवन, दुधा, देवपूर, देऊळघाट, धाड, बोरखेड, साखळी बु., साखळी खुर्द, अंत्री तेली गाव परिसरातील शेत जमिनींचा समावेश होता. दरम्यान, २६ जुनच्या रात्री पुरात वाहून जाणाºया मारुती स्वीफ्ट कारमध्ये दोघे जण असल्याचे निष्पन्न झाले. रात्री १० वाजताच्या सुमारास प्रमोद सपकाळ व गजानन धोटे (रा. कोलवड) कार (क्रमांक एम -एच- २८ -बी- बी- १३९५) ने जात असताना त्यांची कार पुराच्या पाण्यात वाहू लागली.
यावेळी उपस्थित नागरिकांनी प्रसंगावधान व धाडस दाखवत दोघांना बाहेर काढले. यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेची माहिती अविनाश सपकाळ यांनी २७ जून रोजी दुपारी १२ वाजता बुलडाणा शहर पोलिसांना दिली.
जिल्ह्यात आतापर्यंत ७३.१९ टक्के पाऊस
जिल्ह्यात आतापर्यंत ७३.१९ टक्के म्हणजे पाऊस झाला आहे. एकूण पावसाची १३४७.२ मि.मी. नोंद झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक शेगाव तालुक्यात १५३.८ मि.मी. म्हणजे १२७.१७ टक्के पाऊस झाला आहे. तर बुलडाणा तालुक्यात १७०.७ मि.मी. म्हणजे १०७ टक्के पाऊस झाला आहे.