पाण्याचे खासगीकरण नको सामुदायिकरण करा
By admin | Published: May 25, 2015 02:27 AM2015-05-25T02:27:12+5:302015-05-25T02:27:12+5:30
जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह यांच्याशी संवाद.
बुलडाणा : पंचमहाभूतांपासून निर्माण होणार्या व्यवस्थेवर कुणाचीही मालकी नसते; मात्र अलीकडच्या काळात पाण्याचे खासगीकरण करण्यावर भर दिला जात आहे. निसर्गाने दिलेले पाणी बाटलीबंद होऊन कितीतरी पट अधिक किमतीने विकल्या जात आहे. ही प्रक्रिया भविष्यात पाण्याच्या खासगीकरणाकडे होणारी वाटचाल आहे. त्याचा धोका वेळीच ओळखा, पाण्याचे खासगीकरण न होता ते सामुदायिकरण झाले पाहिजे. पाणी हे समाजाच्या मालकीचे असले पाहिजे; परंतु समाजानेही मालक म्हणून जबाबदारीने पाण्याचा उपयोग करणे आवश्यक आहे तरच पाण्याचे संवर्धन होईल व जलक्रांतीचे स्वप्न प्रत्यक्षात येईल, अशा शब्दात भारताचे जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रश्न : पाण्याविषयी लोकांमध्ये जागृती का वाढत नाही ?
आहे, लोकांमध्ये जागृती आहे; मात्र लोकांमधील जागृती ही एकसंघपणे समोर दिसत नाही. वैयक्तिकरित्या पाण्याची बचत करणारे अनेक लोक आहेत; मात्र जोपर्यंंत समाज एकसंघपणे असा विचार करीत नाही तोपर्यंत त्याचे फलित आपल्या समोर येत नाही. येणार्या काळात समाजातील प्रत्येक घटकाने अधिक जबाबदारीने पाण्याविषयी जागृत होणे गरजेचे आहे.
प्रश्न : राजस्थानसारखा जलप्रयोग महाराष्ट्रात का होत नाही ?
राजस्थानपेक्षाही महाराष्ट्रामध्ये पाण्याच्या संवर्धनाबाबत अधिक वेगाने व दर्जेदार असे प्रयोग होऊ शकतात; मात्र दुर्दैवाने येथील नागरिकांमध्ये पाणी वापरण्याबाबत ह्यशिस्तह्ण नाही. सरासरी ६00 ते ७00 मिमी. पाऊस या प्रदेशात पडत असल्याने पावसाचे महत्त्व गांभीर्याने घेतले गेले नाही. स्वतंत्र भारतामध्ये जेवढी धरणे झाली त्यापैकी तब्बल ४४ टक्के धरणे ही महाराष्ट्रात झाली. तरी पाण्यासाठी महाराष्ट्र का भटकतो, याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे.
प्रश्न : महाराष्ट्रातील धरणांचा उपयोग झाला नाही, असे वाटते का ?
निश्चितच धरणांचा उपयोग झाला आहे; मात्र ज्या उद्देशांसाठी धरणे किंवा जलसंधारणाची कामे होतात त्यापेक्षा इतर कामांसाठीच याचा उपयोग अधिक होतो. जलपुनर्भरण, जलसंवर्धन हे प्रयोग केल्या गेले तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निश्चितच कमी होईल व धरणातील पाणी हे सिंचनासाठी वापरता येईल. या दृष्टीने अधिक विचार केला पाहिजे.
प्रश्न : पाणी या विषयावर आगामी काळात काय केले पाहिजे ?
मी सुरुवातीलाच सांगितले, शिस्त पाळा. पाण्याचा वापर शिस्तीने करा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे राजसत्ता व समाज यांनी एकत्र येऊन पाण्याच्या विषयावर काम केले पाहिजे. सर्वकाही सरकार करेल, ही भावना आता बंद करा. लोकांचा सहभाग वाढला पाहिजे. लोकांनी अधिक जबाबदार झाले पाहिजे. माझे गाव माझे पाणी ही भावना जोपर्यंंत निर्माण होत नाही तोपर्यंंत पाण्याबाबत गांभीर्याने विचार होणार नाही.
प्रश्न : ग्रीन युरिन संदर्भात सद्या देश पातळीवर चर्चा सुरू आहे. त्याबाबत काय वाटते ?
यात नवीन काही नाही. मलमूत्रामध्ये असलेल्या रासायनिक घटकांचा वापर करून जगाच्या पाठीवर अनेक प्रयोग झाले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विधानानंतर ही चर्चा सुरू झाली; मात्र असे प्रयोग प्रत्यक्षात आले तरच त्याचा उपयोग होईल. त्यांनी फक्त बोलून थांबू नये तर करून दाखवावे. निश्चितच त्याचा फायदा होईल.
प्रश्न : महाराष्ट्रासाठी कुठले मॉडेल सुचवू इच्छिता ?
महाराष्ट्रच देशासमोर मॉडेल उभा करण्याची क्षमता ठेवणारा प्रदेश आहे. सध्या जलयुक्त शिवार हे अभियान सुरू आहे. ते प्रामाणिकपणे व लोकांचा सहभाग घेऊन राबविले तर हेच मॉडेल देशासाठी अधिक चांगल्या पद्धतीने देता येईल फक्त यामधील कामे दर्जेदार व्हावी, लोकांचा सहभाग वाढावा व ही कामे योग्य अशा तांत्रिक दृष्टीने उपयुक्त असणे गरजेचे आहे.