ऑनलाइन शिक्षणासाठी कुणी मोबाइल देता का मोबाइल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:23 AM2021-07-04T04:23:32+5:302021-07-04T04:23:32+5:30
बुलडाणा : कोरोना विषाणू संसर्गामुळे शिक्षणाचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. मागील संपूर्ण वर्ष शाळा, महाविद्यालयांचे शिक्षण ऑनलाइन सुरू होते; ...
बुलडाणा : कोरोना विषाणू संसर्गामुळे शिक्षणाचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. मागील संपूर्ण वर्ष शाळा, महाविद्यालयांचे शिक्षण ऑनलाइन सुरू होते; परंतु यातील केवळ ६० टक्केच मुलांपर्यंत ऑनलाइन शिक्षण पोहोचले आहे. अनेक मुलांकडे मोबाइल नाहीत. घरात एकच मोबाइल, ज्या घरात दोन मुले आहेत त्यांनाही अडचणी निर्माण झाल्या. एकंदरीत कसेबसे शिक्षण विभागासह पालकांनीही ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली मागील शैक्षणिक वर्ष पूर्ण केले; परंतु यंदा पुन्हा ऑनलाइन शिक्षणाने शिक्षकांसह पालकांसमोरही मोठा पेच निर्माण केला आहे. त्यामुळे चक्क शिक्षण विभागाला ऑनलाइन शिक्षणासाठी कुणी मोबाइल देता का मोबाईल, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
प्रत्येकाच्या घरात जुणे, नादुरुस्त मोबाइल असतात. अनेक जण नवीन मोबाइल घेतल्यानंतर आपल्याकडील जुन्या मोबाइलचा उपयोग करीत नाहीत. त्यामुळे असे मोबाइल कमी किमतीत मोबाइल विक्रेत्याला देतात किंवा तो मोबाइल तसाच घरातच पडून राहतो. त्यामुळे असे मोबाइल गोरगरीब मुलांना ऑनलाइन शिक्षणासाठी दान देण्याचे आवाहन बुलडाणा जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी केले आहे. या आवाहनाला जिल्ह्यात बऱ्यापैकी प्रतिसादही मिळत आहे.
कोरोना संसर्गामुळे शाळा सुरू नसल्या तरी ऑनलाइन शिक्षण सर्वत्र सुरू आहे; परंतु निम्म्या विद्यार्थ्यांनाच मोबाइलद्वारे ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. त्यातही ग्रामीण भागात मोबाइल शेतात, विद्यार्थी घरी अशी परिस्थिती आहे. जिल्हा परिषद शाळेतून व्हाॅट्सॲपवर गृहपाठ पाठवून ऑनलाइन शिक्षण पूर्ण केले जात आहे. मात्र, इतर विद्यार्थ्यांकडे मोबाइल नसल्याने ऑनलाइन शिक्षणात अडचणी येतात. ऑनलाइन शिक्षणामध्ये मोबाइल महत्त्वाचा असून, एकट्या बुलडाणा जिल्ह्यामध्ये ५७ टक्के पालकांकडे अँड्रॉइड मोबाइलच नाही. मोबाइल नसलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन शिक्षण पोहोचविणे अवघड जात आहे. ऑनलाइन शिक्षणात तांत्रिक अडचणींचा खोडा येत आहे. शिक्षकांनी गृहपाठ तयार करून विद्यार्थ्यांना व्हाॅट्स ॲपवर पाठविण्याचा उपक्रम सुरू केला आहे. अनेक विद्यार्थ्यांना टीव्ही केबलद्वारे काहींना इतर माध्यमांद्वारे शिक्षण दिले जात आहे.
ऑनलाइन शिक्षणात काय आहेत अडचणी?
१. ज्या पालकांकडे मोबाइल आहेत, ते बाहेर कामात असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत अभ्यास पोहोचत नाही.
२. पालकांना दीक्षा ॲप किंवा इतर माध्यमांची माहितीच नाही. शाळा बंद, शिक्षण सुरू, अशा अभ्यासमालांची माहिती नाही.
३. ग्रामीण भागात इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होते. ४. ग्रामीण भागातील भारनियमनामुळे मोबाइलची बॅटरी पुरत नाही.
ऑनलाइनवर मुले खरंच शिकतात का?
आपला मुलगा मोबाइलसमोर बसलेला आहे; परंतु तो मोबाइलवर अभ्यासच करीत आहे, की गेम खेळतो किंवा व्हिडिओ बघतो हे अनेक पालक बघतच नाहीत. पाचवीनंतरची मुले असतील, तर ते इतर मित्रांसोबतच चॅटिंग करतात. लहान मुले असतील तर ते कार्टूनचे व्हिडिओ बघण्यात गुंतलेली असतात. त्यामुळे ऑनलाइनवर मुले खरंच शिकतात का, हे बघणेही महत्त्वाचे आहे.
तुमची एक मदत करू शकते विद्यार्थ्याची प्रगती
गोरगरीब मुलांना आपल्याकडे शिल्लक असलेला मोबाइल दान देण्याचे आवाहन जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. या उपक्रमाचा शुभारंभ खुद्द शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी आदिवासीबहुल गावातील एका मुलाला मोबाइल दान देऊन केला आहे. त्यामुळे प्रत्येकाने या उपक्रमात हातभार लावला तर अनेक मुले ऑनलाइन शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकतात. तुमची एक मदत एखाद्या गोरगरीब मुलाच्या शैक्षणिक प्रगतीला हातभारही लाऊ शकते.