बुलडाणा : गत काही वर्षांपासून शिक्षकभरतीच हाेत नसल्याने डीएडकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे़ जिल्ह्यातील १६६० जागांसाठी केवळ ३५६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. तब्बल १३०४ जागा रिक्त राहणार असल्याने अनेक अध्यापक विद्यालये ओस पडणार आहेत.
डीएड, बीएड महाविद्यालयांना माेठ्या प्रमाणात मंजुरी दिल्याने गत काही वर्षांत पदवी, पदविका मिळवणाऱ्यांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढली. पदवी मिळवणाऱ्यांची संख्या वाढली असली तरी शासनाने शिक्षक भरतीला परवानगी दिली नाही. त्यातच टीईटी उत्तीर्णची अट असल्याने अनेकांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. गेल्या वर्षीही माेठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्या हाेत्या. विद्यार्थीच मिळत नसल्याने अनेक अध्यापक विद्यालये बंद हाेण्याच्या मार्गावर आहेत़
जिल्ह्यातील एकूण डीएड काॅलेज
२९
एकूण जागा
१६६०
झालेले प्रवेश
३५६
नाेकरीची हमी नाही
शिक्षक भरतीवर गत काही वर्षांपासून बंदी घालण्यात आली हाेती. त्यातच पवित्र पाेर्टलवरून भरती सुरू करण्यात आली असून त्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण असण्याची अट आहे.
जिल्ह्यात आधीच माेठ्या प्रमाणात डीएड आणि बीएड धारक विद्यार्थी बेराेजगार आहेत.
डीएड केल्यानंतर राेजगार मिळेलच याची शाश्वाती नाही. त्यामुळे विद्यार्थी डीएडला प्रवेशच घेत नसल्याचे चित्र आहे.
विद्यार्थी म्हणतात...
गेल्या काही वर्षांपासून शिक्षक भरतीच झाली नाही. आधीच अनेक विद्यार्थी बेराेजगार असताना शासनाने टीईटी, टेट परीक्षेची अट लादली आहे. त्यामुळे, डीएड न करता बीएला प्रवेश घेतला आहे़
-प्रथमेश लाेखंडे, विद्यार्थी
शिक्षक भरती बंद असल्याने अनेक डीएड, बीएडधारक बेराेजगार झालेले आहेत. त्यातच सीईटी, टेट परीक्षा देऊनही राेजगार मिळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे डीएडला प्रवेश घेतला नाही़
-परीक्षित राठाेड, विद्यार्थी
शिक्षक भरती बंद असल्याचा परिणाम
सन २०१० पासून शिक्षक भरती झाली नाही. त्यातही आता टीईटी, टेट परीक्षा उत्तीर्ण हाेण्याची अट ठेवण्यात आली आहे़ त्यामुळे, डीएड, बीएडकडे असलेला विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला आहे. यावर्षीही खूप कमी अर्ज आलेले आहेत़
-डाॅ. विजयकुमार शिंदे, प्राचार्य डायट
डीएड, बीएडची पदवी घेऊन बेराेजगार हाेणाऱ्याची संख्या अलीकडे माेठ्या प्रमाणात वाढली आहे. पदवी घेऊनही नाेकरी मिळेलच याची शाश्वती नाही. राेजगाराची संधीच नसल्याने काही वर्षांपासून डीएड, बीएडकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला आहे़
-प्रा. डाॅ. राजेश खंडेराव