'समृद्धी'च्या गौण खनिज उत्खननातून ‘डबल प्रॉफिट’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 05:47 PM2019-05-04T17:47:58+5:302019-05-04T17:48:10+5:30
समृद्धी महामार्गाला मुरूम तर मिळतोच शिवाय जलस्त्रोतांचेही खोलीकरण होत आहे, असा ‘डबल प्रॉफिट’ समृद्धीसाठी लागणाºया गौण खनिजाच्या उत्खननातून साधला जात आहे.
- ब्रम्हानंद जाधव।
बुलडाणा : नागपूर-मुंबई हा समृद्धी महामार्गबुलडाणा जिल्ह्यातून ८७.२९0 कि.मी. अंतराचा जात आहे. त्यासाठी सध्या कोरड्या पडलेल्या धरण, तलावातून मुरूमाचे उत्खनन केले जात आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाला मुरूम तर मिळतोच शिवाय जलस्त्रोतांचेही खोलीकरण होत आहे, असा ‘डबल प्रॉफिट’ समृद्धीसाठी लागणाºया गौण खनिजाच्या उत्खननातून साधला जात आहे.
नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्ग बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर, लोणार, सिंदखेड राजा व देऊळगाव राजा या तीन तालुक्यातून जात आहे. या समृद्धी महामागार्साठी आवश्यक असणाºया जमीन खरेदी काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात महामार्गाच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. परंतू समृद्धी महामार्ग नागरिकांच्या सोयीसाठी असल्याने या कामात अडथळे येऊ नयेत, यासाठी प्रशासनाला सुरूवातीपासूनच तारेवरची कसरत करावी लागली. या कामामध्ये अडथळ्यांचा डोंगर मात्र सदैव येत आहे. जिल्ह्यातून महामार्गाचे काम सुरू झाल्यानंतर त्यासाठी लागणाºया गौण खनिजाकरीता प्रशासनाला अनेक अडचणीला तोंड द्यावे लागले. ई क्लास जमीन, धरण, तलाव या ठिकाणावरून मुरूमाचे उत्खनन करण्यास सुरूवातीला स्थानिक लोकांनी विरोधही केला. मात्र सध्या मेहकर तालुक्यातून समृद्धी महामार्ग जात असलेल्या परिसरातील गावांमधून मुरूमाची वाहतूक जोरात सुरू आहे. कोरडे पडलेले धरण, तलाव, नदी, याठिकाणावरून महामार्गाच्या कामासाठी मुरूमाचे उत्खनन केल्या जात असल्याने डबल फायदा यातूनसाधला जात आहे. महामार्गाच्या कामासाठी लागणाºया मुरूमाची गरज भागविल्या जात आहे. तर दुसरा फायदा म्हणजे ज्या ठिकाणी उत्खनन होत आहे, त्या धरण, नदी किंवा तलावाचे चांगल्या प्रकारे खोलीकरण होत आहे. भविष्याच्या दृष्टीने जलस्त्रोतांचे हे खोलीकरण अत्यंत फायद्याचे ठरणार आहे.
दिवस-रात्र मुरूमाची वाहतूक
मेहकर तालुक्यात सध्या समृद्धी महामार्गाच्या कामाला वेग आला आहे. महामार्गाच्या कामासाठी लागणाºया मुरूमाची दिवस-रात्र वाहतूक सुरू आहे. शहापूर, ऊमरा देशमुख, आंध्रुड, गोहोगाव दांदडे शिवारातून धरण, नदी, तलावातील मुरूमाचे उत्खनन सुरू आहे. त्यासाठी छोटी-मोठी शेकडो वाहने कामाला लागले असून दिवसा व रात्रभरही मुरूमाची वाहतूक केली जात आहे.
फायद्यापाठोपाठ तोटेही
महामार्गासाठी लागणाºया मुरूम उत्खननातून फायद्यापाठोपाठ तोटेही दिसून येतात. ज्या ठिकाणी मुरूम उत्खनन केल्यास अडचणी येऊ शकतात, अशा ठिकाणीही उत्खनन होत आहे, मध्यंतरी तशा तक्रारी सुद्धा मेहकर तालुक्यातून समोर आल्या. मुरूमाची वाहतूक करणाºया जड वाहनाने इतर रस्त्यांचीही वाट लागली आहे.