किनगाव जट्टू परिसरात दुबार पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:23 AM2021-07-04T04:23:37+5:302021-07-04T04:23:37+5:30
किनगाव जट्टू : परिसरात झालेल्या अति पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील जमीन खरडली आहे़ त्यामुळे, पिके वाहून गेल्याने ...
किनगाव जट्टू : परिसरात झालेल्या अति पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील जमीन खरडली आहे़ त्यामुळे, पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली़ नुकसान झालेल्या भागात प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी लोणार तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे़
किनगाव जट्टू परिसरात २७ जून राेजी एक ते दीड तास जाेरदार पाऊस झाला हाेता़ त्यामुळे शेतात पाणी साचले हाेते़ तसेच शेत शिवारातील नाल्यांना माेठा पूर आला हाेता़ अनेक नाल्यांचे पाणी शेजारील शेतात घुसल्याने बांध बंदिस्त फुटले़ त्यामुळे, पेरलेल्या शेतातील नेमकेच उगवत असलेले पीक वाहून गेले़ तसेच काही ठिकाणी जमिनी खरडल्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे़ सावरगाव गावाजवळील पूल तुटला तर किनगाव जट्टू येथील विठ्ठल दास दायमा यांची विहीर खचली आहे़ सध्या परिस्थितीत ज्या शेतकऱ्याचे पीक वाहून गेले आहे, त्यांची दुबार पेरणी करीता कसरत सुरू आहे़ गतवर्षी सुद्धा परिसरात बियाणे खराब निघाल्याने
शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली होती़ सोंगणी वेळी अतिवृष्टी झाल्याने उभ्या पिकाचे अतोनात नुकसान झाले हाेते़ पेरणीला लागलेला खर्च वसूल झाला नाही त्यामुळे शेती व्यवसाय जुगाराच्या खेळाप्रमाणे शेतकरी दरवर्षी खेळ खेळतो परंतु कधी अतिवृष्टी तर कोरडा दुष्काळ आशा अस्मानी सुलतानी संकटाने शेतकरी पार वैतागला आहे़ २७ जून रोजी झालेल्या अति पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी निवेदनात केली आहे़ या निवेदनावर अध्यक्ष अनिल मोरे, उपाध्यक्ष अनिल लांडगे ,सचिव विकास मुळे ,भागवत मुर्तंडकर आदींची स्वाक्षरी आहे़