दुष्काळी परिस्थितीतही २ एकरात घेतली ४०० क्विंटल हळद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 01:49 PM2019-05-06T13:49:47+5:302019-05-06T13:49:55+5:30
वरवट बकाल: संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील शेतकऱ्याने २ एकरात तब्बल ४०० क्विंटल हळदीचे उत्पादन घेतले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरवट बकाल: संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील शेतकऱ्याने २ एकरात तब्बल ४०० क्विंटल हळदीचे उत्पादन घेतले आहे. दुष्काळी परिस्थितीतही भरघोस उत्पादन झाल्याने याची तालुकाभरात चर्चा होत आहे.
संग्रामपूर तालुका सातपुड्याच्या पायथ्याशी असून, या भागातील शेतकरी कापूस, हरभरा, तूर, सोयाबीन, उडीद, मुग ही पारंपरिक पिके घेतात. अलीकडच्या काळात शेती परवडत नसल्याने काही शेतकरी इतर पिकांकडे वळत आहेत. असाच एक प्रयोग महादेव डाबरे यांनी केला. त्यांनी २ एकरात ४०० क्विंटल हळदीचे उत्पादन घेत पारंपरिक पिकांना एक सशक्त पर्याय शोधला आहे.
पारंपरिक पीक पध्दतीतून पाहिजे तसे उत्पन्न होताना दिसत नाही. अलीकडे पाऊस पाठ फिरवत असल्याने शेती हा तोट्याचा व्यवसाय झाला आहे; परंतु तालुका मुख्यालयापासून ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या वरवट बकाल येथील शेतकरी महादेव डाबरे यांनी विविध प्रयोग करणे सुरू केले. त्यांना २०१० मध्ये राज्य शासनाचा शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारही मिळाला आहे. वडीलोपार्जीत शेतजमिनीत स्वत:च्या कल्पकतेतून दरवर्षी नवनवीन प्रयोग ते करतात. शेती सुपीक होजास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल, याकडे त्यांचा कल राहतो. (वार्ताहर)-
पाण्याचा प्रश्न सोडविला !
तालुक्यात अनेक शेतकरी प्रचंड मेहनत घेतात, परंतु त्यांना सर्वात मोठी अडचण येते ती पाण्याची. दिवसेंदिवस पाऊस कमी होत असल्याने विहिरी, बोअरवेलला पाणी नाही. त्यामुळे उत्पादन घेणे शक्य होत नाही. पाण्याचा हा प्रश्न डाबरे यांच्या समोरही होताच. परंतु त्यांनी शेताभोवती जलसंधारणाची कामे केली. स्व:खर्चातून त्यांनी पाणी अडविले. नाला खोलीकरण, विहीर पुनर्भरणासारखे प्रयत्न त्यांनी केले. याचेच फलीत म्हणून त्यांच्या शेतातील विहिर, बोअरवेलला पाणी आहे. याच भरवश्यावर ते शेतीत नवनवील प्रयोग करीत आहेत.