- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: दुष्काळ आणि पावसाच्या हुलकावणीमुळे यंदा शेतकºयांकडे घरचे बियाणे उपलब्ध नाही. त्यामुळे महाबीज अथवा खासगी कंपन्यावरच शेतकºयांची मदार राहणार आहे. खरीप हंगाम अवघ्या ३८ दिवसावर आला असून, शेतकºयांना पेरणीसाठी दुष्काळात मोठी आर्थिक तडजोड करावी लागणार आहे. ७ लाख ३८ हजार ५४१ हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी दीड लाख क्विंटल बियाणे लागणार आहे. परंतू खरीपाच्या बियाण्यावर पडलेले दुष्काळाचे ढग शेतकºयांची चिंता वाढवणारे आहे. जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र ७ लाख ४८ हजार ८०० हेक्टर आहे. त्यात गतवर्षी ७ लाख ३५ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली होती. परंतू अत्यल्प पावसाचा खरीप हंगामाला फटका बसला. गेल्यावर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तब्बल २३ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला. सोबतच किमान सात ते अधिकतम २९ दिवसापर्यंत पावसाने जिल्ह्यात दडी मारली होती. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा हा गेल्या सहा वर्षातील निच्चांकी पातळीवर पोहोचला. अनेक शेतकºयांचा तर पेरणीसाठी लागलेला खर्चही वसूल झाला नाही. उत्पादनात कमालीची घट झाली. शेतकरी आर्थिक संकटात सापडले. त्यामुळे शेतकºयांना थोडेबहुत आलेले शेतमालाची विक्री करावी लागली. जिल्ह्याची पैसेवारी ५० पैशाच्या खाली आल्याने या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन कृषी विभागाने यावर्षी खरीप हंगामाचे ७ लाख ३८ हजार ५४१ हेक्टरवर नियोजन केले आहे. त्याकरीता विविध प्रकारचे १ लाख ३९ हजार ४३ क्विंटल बियाणे लागणार आहे. परंतू गतवर्षी पावसाने पाठ फिरविल्याने शेतकºयांकडे यंदा खरीप हंगामासाठी घरचे बी-बीयाणेच शिल्लक राहिलेले नाही. बी-बियाण्याच्या खरेदीसाठी दुष्काळात शेतकºयांना आर्थिक जुळवा-जुळव करणे तारेवरची कसरत होणार आहे. एकूण बियाण्यांपैकी ८७ टक्के सोयाबीनचे बियाणे जिल्ह्यात सुरूवातीला कपाशीचे पीक सर्वाधिक घेतले जात होते. मात्र आता कपाशीची जागा सोयाबीनने घेतली आहे. त्यामुळे खरीप हंगामात जिल्ह्याला लागणाºया एकूण बियाण्यांपैकी ८७ टक्के बियाणे हे सोयाबीनचे आहे. जिल्ह्याला १ लाख २१ हजार ८९० क्विंटल सोयाबीनचे बियाणे लागणार आहे. त्यापैकी ४२ हजार ८३० क्विंटल सोयाबीन बियाणे हे सार्वजनिक कंपनीकडून पुरविले जाणार आहे. तर ७९ हजार ६० क्विंटल सोयाबीन बियाण्याचा पुरवठा खासगी कंपनीमार्फत होणार आहे. सार्वजनिक यंत्रणा पुरविणार ४८ टक्के बियाणे बियाणे हा शेतीमध्ये शाश्वत उत्पादन व उत्पादकता वाढविणेसाठी महत्वाचा घटक असतात. बियाण्याची उपलब्धता ही सार्वजनिक यंत्रणा व खासगी यंत्रणाकडून केली जाते. सावर्जनिक यंत्रणेमध्ये शासनाच्या अर्थात महाबीज सारख्या यंत्रणांचा समावेश येतो. यंदा सार्वजनीक यंत्रणेतून जिल्ह्याला ४८ टक्के बियाण्यांचा पुरवठा होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामध्ये ४५ हजार २६४ क्विंटल बियाण्याचा संभाव्य पुरवठा सार्वजनीक माध्यमातून होणार आहे.